पीटीआय, सानंद (गुजरात)
जागतिक बाजारपेठेत सेमीकंडक्टरचा विश्वसनीय पुरवठादार देश म्हणून भारत आपले स्थान मजबूत करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. गुजरातच्या सानंद येथे केनेस सेमीकॉन्सच्या सेमीकंडक्टर आउटसोर्सिंग प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर, या प्रकल्पामुळे सानंद आणि सिलिकॉन व्हॅलीदरम्यान एका नवा पूल बांधला गेला आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकार आगामी दशकांसाठी तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेची मजबूत पायाउभारणी करत आहे. “जागतिक पातळीवर एकविसावे शतक अनेक आव्हाने घेऊन आले आहे आणि संघर्षांच्या परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे,” असे मोदी म्हणाले. करोना महासाथीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली तेव्हा भारताने सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.
भारत डिसेंबर २०२५मध्ये अमेरिकास्थित ‘पॅक्स सिलिका’ या सामरिक आघाडीत सहभागी झाला. सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) आणि दुर्मीळ संयुगांवर विशेष भर देऊन महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा या आघाडीचे उद्देश आहे. त्याद्दलही पतप्रधानांनी भाष्य केले.
भारत जोमदारपणे सेमीकंडक्टर इकोसिस्टीमची उभारणी करत आहे आणि त्याचवेळी कच्च्या मालासाठी लवचिक पुरवठा साखळी म्हणून आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले जात आहेत. ‘पॅक्स सिलिका’मधील भारताचा सहभाग हा त्याचाच भाग आहे. आमच्या जागतिक भागीदारांबरोबर काम करून सुरक्षित पुरवठा साखळी उभारण्याचे आमचे ध्येय आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
