Indonesia President Prabowo Subianto praise Modi during bilateral meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. ६ ते ८ जुलै दरम्यान पंतप्रधान मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. २०१८ नंतरची त्यांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिनतांग आदिपूर्णा’ दिला गेला. दोन्ही देशांच्या संबंधांना दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पुढाकारासाठी हा पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार प्रदान करत असताना इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बोलत असताना राष्ट्राध्यक्ष प्रबोवो म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांची मी नक्कल करतो. त्यांच्या योजनांवर कोणतेही कॉपीराईट नाही याचा मला आनंद वाटतो.
राष्ट्राध्यक्ष प्रबोवो पुढे म्हणाले, “मी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर हे मान्य करतो की, मी तुमच्या कारकिर्दीची नक्कल केली. तुमच्या अनेक योजना मी अमलात आणल्या आहेत आणि हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही.” हे मान्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांनी भारताने केलेल्या विकासाचेही कौतुक केले.
“इंडोनेशियासारख्याच समस्या असलेल्या देशांत जर एखादी गोष्ट यशस्वी झाली असेल तर ती स्वीकारण्यात काहीही कमीपणा नाही. इंडोनेशियातही कोट्यवधी लोक असून त्याच समस्या आहेत. शेतीची पार्श्वभूमी एकसारखीच आहे. नैसर्गिक आपत्ती आहेत. तरीही भारताने विकासाचे अनेक टप्पे गाठले आहेत. त्यामुळे मी जाहीरपणे कबूल करतो की, मी पंतप्रधान मोदींच्या योजनांना अमलात आणले आहे”, असेही राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी म्हटले.
जमीन सुपीक करण्यासाठी भारताची मदत
राष्ट्राध्यक्ष प्रबोवो पुढे म्हणाले, नापीक किंवा पडीक जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर करण्याच्या तंत्रांचा अभ्यास करण्यासाठी इंडोनेशियाच्या एका शिष्टमंडळाने भारतात अनेक आठवडे घालवले. नुकतेच हे शिष्टमंडळ परतले आहे. याला पर्माकल्चर म्हणतात. आम्ही या तंत्राचा जवळून अभ्यास करत आहोत आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. आम्ही शिकायला अजिबात घाबरत नाहीत.
हिंदी संस्कृतीचा आमच्यावर प्रभाव
इंडोनेशियाच्या संस्कृती, इतिहास आणि जगण्याच्या अनुभवावर हिंदू संस्कृती आणि भारतीय परंपरांचा मोठा प्रभाव असल्याचेही राष्ट्राध्यक्षांनी मान्य केले. एवढेच नाही तर आमच्या भाषेतील ३० ते ४० टक्के शब्द संस्कृत भाषेतील असल्याचेही ते म्हणाले. आमच्याकडे अनेक लोकांची नावेही संस्कृत भाषेतील आहेत. आमचे राष्ट्रीय प्रतीक गरुड यालाही भारतीय आणि हिंदू पौराणिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इंडोनेशियात अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार झाले आहेत. दोन्ही नेत्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंबंधी सामंजस्य कराराचे अनावरण केले. तसेच इंडोनेशियामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संकुल उघडण्याची योजना जाहीर करण्यात आली.
