"खासदारांच्या वेदना समजून घ्या," पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षाच्या प्रमुखांना आवाहन | PM Narendra Modi Interacts with Media Parliament Winter Session G20 Lok Sabha Rajya Sabha sgy 87 | Loksatta

Parliament Winter Session: “खासदारांच्या वेदना समजून घ्या, त्यांना संधी द्या,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षाच्या प्रमुखांना आवाहन

जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी, नरेंद्र मोदींचं विधान

Parliament Winter Session: “खासदारांच्या वेदना समजून घ्या, त्यांना संधी द्या,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षाच्या प्रमुखांना आवाहन

नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. त्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना आणि सभागृह नेत्यांना केलं आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“नुकतीच माझी सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सभागृहातही याचं प्रतिबिंब नक्कीच दिसेल. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. सर्व राजकीय पक्ष चांगली चर्चा करतील, तसंच आपल्या विचारांनी निर्णयांना बळ देतील अशी आशा आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

“मी सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना आवाहन करतो की, नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना जास्त संधी द्यावी. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे.सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. आम्हाल जे शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे त्यापासून आम्ही दूर राहतो अशी त्यांची खंत आहे. त्यामुळे सभागृहाचं काम चालणं महत्वाचं आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“विरोधी पक्षातील खासदारांचंही स्थगिती, गोंधळ यामुळे चर्चेत बोलण्याची संधी मिळत नसल्याचं म्हणणं आहे. सर्व पक्षाचे नेते, सभागृह नेत्यांनी खासदारांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. देशाला त्यांच्या उत्साह, अनुभवाचा निर्णय प्रक्रियेला फायदा झाला पाहिजे. लोकशाहीसाठी हे गरजेचं आहे. हे अधिवेशन फायदेशीर ठरावं यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत,”

“आपण अशावेळी भेटत आहोत जेव्हा देशाला जी-२० परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. जागतिक मंचावर भारताने ज्याप्रकारे आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्याप्रकारे अपेक्षा वाढल्या आहेत, तसंच जागतिक मंचावर भारत ज्याप्रकारे आपला सहभाग वाढवत आहे, अशावेळी जी-२० चं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी मोठी संधी आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“जी-२० परिषद हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर भारताचं सामर्थ्य जगासमोर ठेवण्याची संधी आहे. इतका मोठा देश, विविधता, सामर्थ्य आपल्याकडे आहे. संपूर्ण जगाकडे भारताला जाणून घेण्याची संधी आहे आणि भारतालाही संपूर्ण विश्वाला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:47 IST
Next Story
VIDEO : राहुल गांधींचं फुटबॉल प्रेम, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान पाहिला FIFA World Cupचा सामना