PM Narendra Modi can mediate the Iran-Israel war: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाला आता एक महिना होत आहे. या महिन्याभरात या युद्धाचे चटके जगभरातील अनेक देशांना बसले आहेत. युद्धातून बाहेर पडण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नसताना आता युद्धविरामासाठी एका विश्वासार्ह मध्यस्थाचा शोध घेतला जात आहे. या विषयावर भू-राजकीय घडामोडींचे तज्ज्ञ आणि अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डग्लस मॅकग्रेगर म्हणाले, “इराणबरोबर सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षाचा तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णायक भूमिका बजावू शकतात.” याचबरोबर संभाव्य मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचा उल्लेख होत आहे, यावरही त्यांनी टीका केली. पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले.

ट्रम्प पंतप्रधान मोदींचे ऐकू शकतात

युद्धविरामाबाबत बोलताना डग्लस मॅकग्रेगर म्हणाले की, जर भारताने मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे म्हणणे ऐकून घेण्याची शक्यता आहे. भारताच मध्यस्थाची भूमिका का पार पाडू शकतो, यावर बोलताना मॅकग्रेगर म्हणाले की, मी भारताची निवड करण्याचे कारण म्हणजे मला वाटते की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या टप्प्यावर पंतप्रधान मोदींचेच ऐकू शकतात.

भारताची वाढती आर्थिक आणि लष्करी ताकद, तसेच भारताबद्दलचा जागतिक स्तरावर असलेला विश्वास, यामुळे भारत एका चांगल्या स्थितीत आहे. “तुम्हाला कल्पना नसेल पण भारत सध्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मजबूत स्थितीत आहे”, अशी टिप्पणी मॅकग्रेगर यांनी एएनआयशी बोलताना दिली.

मॅकग्रेगर पुढे असेही म्हणाले की, रशिया आणि इराणपासून ते इस्रायल आणि अमेरिकेपर्यंत जगातील सर्व प्रमुख जागतिक शक्तींमध्ये भारताबद्दल एक दुर्मिळ विश्वास आहे. त्यामुळे विरोधी गटात भारत एक दुवा म्हणून काम करू शकतो.

पंतप्रधान मोदींचे सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध

पंतप्रधान मोदी असे व्यक्ती आहेत, जे मॉस्कोमध्ये पुतिन यांच्याशी मनमोकळा संवाद साधतात, ते इराणच्या नेतृत्वाशी सहज बोलू शकतात. इस्रायलचे नेतृत्वही त्यांच्याशी आदराने संवाद साधते आणि आम्हालाही (अमेरिका) ते सोयीस्कर वाटतात, असेही मॅकग्रेगर यांनी सांगितले.

पाकिस्तानची उडवली खिल्ली

डग्लस मॅकग्रेगर यांनी भारताबाबत विश्वास व्यक्त करत असतानाच पाकिस्तानच्या संभाव्य मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, “पाकिस्तानने मदत देऊ करणे म्हणजे जळत्या इमारतीत अडकलेल्या व्यक्तीने त्या इमारतीमधील एक रिकामी खोली देऊ करण्यासारखे आहे.”

पाकिस्तान सध्या त्यांच्या अंतर्गत आव्हानांनी, आर्थिक अडचणींनी घेरलेला आहे. त्यामुळे कोणतीही अर्थपूर्ण राजनैतिक भूमिका बजावण्याच्या त्यांच्या क्षमतेला मर्यादा येते. तसेच इस्रायल पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारे तटस्थ म्हणून पाहणार नाही, असा युक्तिवाद मॅकग्रेगर यांनी केला.