जेरुसलेम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवारी इस्रायलमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियन विमानतळावर उपस्थित होते.पंतप्रधान मोदींचा गेल्या नऊ वर्षांतील इस्रायलचा हा दुसरा दौरा आहे. जुलै २०१७ मध्ये मोदी इस्रायलमध्ये आले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला.

नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना आलिंगन दिले. त्यानंतर विमानतळावर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. नेतान्याहू आणि मोदी गुरुवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. इस्रायलच्या दौऱ्यापूर्वी जाताना मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, याची खात्री असल्याचे वक्तव्य केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होईल.

काँग्रेसचा केंद्र सरकारवर आरोप

नवी दिल्ली: अमेरिकेमध्ये एप्स्टिन फाइल्स जाहीर करण्यात आल्या असून, भारत-इस्रायलमधील २०१४ नंतरच्या संबंधांना बाललैंगिक गुन्हेगार असलेल्या या एप्स्टिनने आकार दिल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, ‘भारताचे इस्रायल आणि पॅलेस्टाइनबाबतचे धोरण कायम ‘द्विराष्ट्र सिद्धांता’वर आधारित होते. मात्र, ‘अमेरिका-इस्रायल लॉबी’ने ते बदलले. एप्स्टिन हा सामान्य नागरिकांसाठी कुख्यात गुन्हेगार आहे. मात्र, मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामध्ये तो एखादा नायक आहे.’

दौऱ्याबद्दल उत्सुकता

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याबद्दल इस्रायलमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. जागतिक पातळीवर इस्रायल अनेक आव्हानांना सामोरे जात असताना भारताबरोबरचे संबंध महत्त्वाचे असल्याचे तेथील माध्यमांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी इस्रायलचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या क्नेसेटमध्ये भाषण करणार आहेत. त्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा इस्रायल आणि भारताचे झेंडे लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा क्षण आहे, तसेच द्विपक्षीय संबंधांसाठी हा निर्णायक टप्पा असल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे.

कोट भारत आणि इस्रायलमध्ये बहुस्तरीय सामरिक भागीदारी आहे. नजीकच्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे. नेतान्याहू यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून विज्ञान-तंत्रज्ञान, नवनिर्मिती, कृषी, संरक्षण, व्यापार अशा विविध क्षेत्रांत दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान