PM Modi Italy Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. युरोपच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान मोदी इटलीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांचं इटलीत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत करत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे. या पोस्टला ‘वेलकम टू रोम, माय फ्रेंड’, असं कॅप्शन जॉर्जिया मेलोनी यांनी दिलं आहे. जॉर्जिया मेलोनी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी मंगळवारी इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर घेतलेला एक सेल्फी शेअर केला. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरचा हा सेल्फी शेअर करत जॉर्जिया मेलोनी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं की, “वेलकम टू रोम, माय फ्रेंड!” तसेच या कॅप्शनमध्ये जॉर्जिया मेलोनी यांनी इटली आणि भारताचा राष्ट्रध्वज दर्शवणारे दोन इमोटिकॉन्स देखील शेअर केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, “मी रोममध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर रात्रीच्या जेवणाचा योग आला. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध कोलोसियमला भेट दिली. यावेळी आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आज होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे. त्यामध्ये आम्ही भारत आणि इटलीमधील मैत्री अधिक दृढ करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. याच पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर चर्चा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
पंतप्रधान मोदींचा इटली दौरा का? कोणते निर्णय होणार?
पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, “मी इटलीतील रोम शहरात दाखल झालो आहे. आज राष्ट्रपती सर्जियो मट्टरेल्ला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि इटली यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणं हा आहे. ज्यामध्ये भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर (IMEC) विशेष लक्ष दिलं जाईल. संयुक्त धोरणात्मक कृती योजना २०२५-२०२९ चा देखील आढावा घेतला जाईल. मी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मुख्यालयालाही भेट देणार आहे. त्यामुळे बहुपक्षीयता आणि जागतिक अन्न सुरक्षेप्रती भारताची वचनबद्धता अधिक दृढ होईल”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
IMEC वरील चर्चा महत्त्वाची का आहे?
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाच्या चर्चांपैकी एक म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी). हा केवळ एक व्यापारी मार्ग नाही, तर भारत, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी महत्वाचा असेल. या कॉरिडॉरमध्ये रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि समुद्राखालील डिजिटल केबल्स यांचा समावेश असेल. हा प्रकल्प एकदा पूर्ण झाल्यावर जागतिक व्यापाराचा नकाशा पूर्णपणे बदलू शकतो.
जॉर्जिया मेलोनींनी याआधीही मोदींबरोबरचा सेल्फी केला होता शेअर
जॉर्जिया मेलोनी यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला होता. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) सेल्फी शेअर करताना #Melodi असा हॅशटॅग वापरला होता. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये “सीओपी-२८ मधील चांगले मित्र” असं लिहिलं होतं. पीएम मेलोनी यांनी शेअर केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या होत्या. जॉर्जिया मेलोनी यांनी पोस्टमध्ये वापरलेल्या हॅशटॅगची देखील चर्चा झाली होती. Meloni आणि Modi असे दोन शब्द एकत्रित करत इटलीच्या पंतप्रधानांनी Melodi असा हॅशटॅग वापरला होता.
Good friends at COP28.#Melodi pic.twitter.com/g0W6R0RJJo
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 1, 2023
संयुक्त अरब अमिराती येथे ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’चं (सीओपी-२८ समिट) आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. यावेळी मलोनी यांनी मोदींबरोबर सेल्फी काढला होता. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता आणि चर्चेचा विषय ठरत होता.
पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रीस्टरसन यांच्यामध्ये द्विस्तरावरील संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. स्वीडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यादेखील बैठकीत सहभागी झाल्या होत्या. पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट करण्यावर उभय नेत्यांत एकमत झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार, डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस’ हा स्वीडनमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. भारत-स्वीडनमधील संबंध अधिक मजबूत करण्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे नेतृत्व यांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. मोदी यांनी उद्योगांसाठीच्या ‘युरोपियन राउंड टेबल’मध्ये सहभाग घेतला. भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे त्यांनी युरोपीय कंपन्यांना आवाहन केले.
पंतप्रधान मोदींची नॉर्वेच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचाही दौरा केला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, हरित तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली. गेल्या ४३ वर्षांतील भारतातील पंतप्रधानांनी केलेला हा पहिलाच दौरा होता.
