pm narendra modi joe biden meet at g20 summit bali indonesia | Loksatta

G20 Summit: परिषदेत आलेले जो बायडेन थेट मोदींच्या दिशेने, हस्तांदोलन आणि गुजगोष्टी; व्हिडीओ व्हायरल!

परिषदेच्या ठिकाणी बायडेन दाखल होताच आपल्या जागेवर जाण्यापूर्वी ते थेट मोदींकडे आले. दोन्ही नेत्यांनी…

pm narendra modi g20 summit joe biden meet
G20 Summit: परिषदेत मोदी-बायडेन भेट!

१७व्या जी२० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बालीमध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी जी२० गटातील सर्व राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक हेही या परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेआधी सुनक यांची भेट घेऊन त्यांच्याशी काहीकाळ वार्तालापही केला. मात्र, ऐन परिषद सुरू होण्यापूर्वी आपल्या जागेवर जाण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आवर्जून भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही बोलणं झालं. बायडेन यांनी मोदींना आलिंगन दिल्याचंही सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

जो बायडेन यांच्या मोदींशी गुजगोष्टी!

गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या अनेक घडामोडींमुळे यंदा होणारी जी२० परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचं बोललं जात आहे. या परिषदेमध्ये रशिया-युक्रेन युद्धापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती अशा मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद सुरू होण्याच्या काही क्षण आधी जो बायडेन यांनी मोदींशी हस्तांदोलन करताना काही क्षण चर्चा केल्याचं दिसून आलं.

परिषदेच्या ठिकाणी बायडेन दाखल होताच आपल्या जागेवर जाण्यापूर्वी ते थेट मोदींकडे आले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची गळाभेटही घेतली. त्यानंतर बायडेन पुन्हा वळून मोदींकडे आले आणि त्यांनी मोदींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. यावेळी मोदींनीही त्यांना काहीतरी सांगितल्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यावर दिलखुलास हसत एकमेकांना दाद दिली. “राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्री आहे. ती मैत्री दिसतही आहे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या गृहविभागाचे प्रवक्ते झेड तरार यांनी दिली आहे.

भारताची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेसाठी निघण्याआधी पंतप्रधान कार्यालयाकडून भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली. “माझ्या जी-२० परिषदेतील चर्चेदरम्यान मी भारतानं आजपर्यंत मिळवलेलं यश आणि जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या समस्या एकत्रपणे सोडण्याविषयी आपली बांधीलकी अधोरेखित करणार आहे”, असं मोदींकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

यावेळी मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 12:43 IST
Next Story
Shraddha Murder Case: “जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील, तर त्याचेही…”; श्रद्धाच्या वडिलांचा संताप, पहिल्यांदाच झाले व्यक्त