पीटीआय, नवी दिल्ली
‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आजच्या ‘अमृतपिढी’वर आहे. मात्र, हे ध्येय गाठण्यासाठी देशातील तरुणांनी अमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून कायम दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. देशाला तरुणांची ऊर्जा, कल्पकता आणि कौशल्याची गरज असल्याने व्यसनमुक्त तरुणाई ही विकसित भारताची पूर्वअट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवादाद्वारे झाला. देशभरातील २८ हजारांहून अधिक ठिकाणांहून एक कोटीहून अधिक युवक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत पुढील १०० आठवडे दर रविवारी देशभरात व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आजची तरुणाई ही भारताची ‘अमृतपिढी’ असून, पुढील २० ते २५ वर्षांत देशाची दिशा आणि भवितव्य ठरविण्याची जबाबदारी तिच्यावर असेल, असे मोदी म्हणाले. २०४७ मध्ये भारत विकसित राष्ट्र झाल्यानंतर त्या यशाचा सर्वाधिक लाभही आजच्या तरुण पिढीलाच मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विकसित भारतासाठी शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण तरुणाई आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्त राहणे हे केवळ वैयक्तिक हिताचे नसून कुटुंब, समाज आणि देशाच्या भविष्यासाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्षणिक आनंद; आयुष्याचा विनाश!
‘ड्रग्स’ काही काळासाठी आनंद देतात; मात्र त्याची मोठी किंमत मोजावी लागते. ते तरुणांचे करिअर, कुटुंब आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे प्रत्येक तरुणाने स्वत:तील क्षमता ओळखून अमली पदार्थांच्या विळख्यापासून कायम दूर राहिले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले. व्यसनाधीनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले, की कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी व्यसनाच्या आहारी गेल्यास सामाजिक प्रतिष्ठेपोटी ती बाब लपवू नये. त्याऐवजी तातडीने वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि उपलब्ध सर्व प्रकारची मदत घ्यावी.
घरात मुक्त संवाद हवा मुलांना त्यांच्या अडचणी, तणाव आणि समस्या घरच्यांसमोर मोकळेपणाने मांडता आल्या, तर त्यांना व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता येईल. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात मुक्त संवादाचे वातावरण असणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी सांगितले.
