पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागांना एकत्र आणणाऱ्या PM Gati Shakti या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानीत प्रगती मैदानावर केला. यानिमित्ताने पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याचे मंत्री नितिन गडकरी, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे असे विविध मंत्री उपस्थित होते. केंद्रातर्फे देशात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरु असतात. मात्र अनेकदा या संबंधित खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने प्रकल्पांना उशीर होतो, प्रकल्प रखडतात, प्रकल्पांची किंमत वाढते. तेव्हा अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय रहावा यासाठी संबधित खात्यांना एकत्र आणण्यासाठी PM Gati Shakti सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सुविधेनुसार तंत्रज्ञानाचा वापर करत १६ विविध विभाग – खाती हे एकाच व्यासपीठावर येतील. कुठल्याही प्रकल्पाच्या कामांची माहिती ही सर्व विभागांना मिळेल. यामुळे पुढील समनव्य साधणे, प्रकल्पातील अडचणी सोडवणे, प्रकल्प वेगाने पुर्ण करणे, प्रकल्पाचा अतिरिक्त खर्च वाचवणे हे शक्य होणार आहे. देशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे लवकर पुर्ण होतील, यामुळे लॉजिस्टीक कॉस्ट कमी होत उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधतांना २०१४ च्या आधी सुरु असलेली कामे आणि २०१४ नंतरची कामे याचा एक लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आणि काँग्रेस. काँग्रेस आघाडी सरकारचे थेट नाव ने घेता सडकून टीका केली. ” मी २०१४ ला जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा लक्षात आले अनेक प्रकल्प रखडले होते. तेव्हा संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणत निर्णय प्रक्रिया सुलभ केली. यामुळे अनेक प्रकल्प वेगाने पुर्ण झाले. आता PM Gati Shakti सुविधा मार्फत सर्व विभाग हे अधिक समन्वय साधत काम करतील. यामुळे या २१ व्या शतकात देशाची प्रगती आणखी वेगाने होईल”:  असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. काही राजकीय पक्ष महत्त्वाच्या प्रकल्पांवर टीका करतात, मात्र जगात हे सिद्ध झालं आहे की पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे झाली तर विकास होतो, रोजगार निर्माण करतात असंही पंतप्रधान म्हणाले. 

७० वर्षांच्या तुलनेत आता वेगाने विकास कामे सुरु आहेत. २०१४ च्या पाच वर्ष आधी काय स्थिती होती ? याआधी देशात १९९० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले होते. मात्र २०१४ नंतर देशात ९००० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. याआधी देशांत ३००० किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, मात्र ७ वर्षात २४ हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. २०१४ च्या आधी देशात फक्त २५० किमी मार्गावर मेट्रो धावत होती. आज ७०० किमीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला असून आणखी एक हजार किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. २०१४ च्या आधी ५ ठिकाणी जलमार्ग वाहतुक सुरु होती आता ही संख्या १३ वर गेली आहे. बंदरात माल उतरण्याचा कालावधी हा याआधी ४१ तास होता, तो आता २७ तासांवर आला असून यापुढील काळात आणखी कमी होणार आहे अशी माहिती मोदी यांनी देत काँग्रेस सरकारने नाव न घेता सडकून टीका केली.

या सुविधेमध्ये देशातील राज्य सरकारनेही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी केले. या PM Gati Shakti सुविधेच्या माध्यमातून पुढील ३-४ वर्षात देशात २०० विमानतळ – हेलिपोर्ट आणि जलवाहतुक मार्ग सुरु करणार असल्याचं मोदी यांनी यावेळी जाहिर केलं. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi launched pm gati shakti master plan for infrastructure projects asj82
First published on: 13-10-2021 at 14:36 IST