PM Modi in Assam: आसाममधील मोरन येथे ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (ELF) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत येथील महामार्गावरील धावपट्टीवर लढाऊ विमान उतरविण्यात आले. आसामच्या धोरणात्मक आणि पायाभूत सुविधा विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30MKI आणि राफेल लढाऊ विमानाचे लँडिंग आणि उड्डाण करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांना उतरता यावे आणि उड्डाण घेता यावे, यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग खास पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. आसाममध्ये काही दिवसांनी निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी राज्यात ४.२ किमी लांबीच्या महामार्गाचे उद्घाटन केले.
चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ३०० किमीहून कमी अंतरावर असलेल्या या महामार्गाचे धावपट्टीत रूपांतरित केले आहे. राष्ट्रीय महामार्ग १२७ च्या दिब्रुगड-मोरान महामार्गावर ही धावपट्टी विकसित करण्यात आली आहे.
अप्पर आसाममध्ये निर्माण केलेल्या या सुविधेमुळे ईशान्य भारतात लष्कराच्या सुविधांमध्ये एक धोरणात्मक भर पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या प्रदेशात हवाई दलाच्या कामकाजाला अधिक लवचिकता मिळेल. ४.२ किमींच्या या काँक्रिट धावपट्टीवर कोणताही मध्यवर्ती दुभाजक नाही. त्यामुळे विमानांची हालचाल सुरळीत होऊ शकते. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कुंपण बसविण्यात आले आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आसाममधील दिब्रुगड विमानतळ किंवा चाबुआ हवाई दल स्थानकावरून काम करणे अशक्य झाल्यास किंवा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ते अनुपलब्ध झाल्यास पर्यायी लँडिंग पर्याय म्हणून या महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे.
