जेवर (उत्तर प्रदेश) : ‘केंद्र आणि उत्तर प्रदेशातील या पूर्वीच्या सरकारने या राज्याला हीन वागणूक देऊन तेथील जनतेला अंधारात ठेवले. केवळ आश्वासने दिल्याने उत्तर प्रदेश विकासापासून वंचित राहिला. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या ‘डबल इंजिन’ सरकारने उत्तर प्रदेशचा विकास केला असून आता उत्तर प्रदेश केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

उत्तर प्रदेशातील जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार यांनी केलेल्या कामांचा पाढा मोदी यांनी या वेळी वाचला. नवे विमानतळ निर्यातीचे मोठी केंद्र बनणार असून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी वाव मिळणार आहे.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून ते उत्तर भारताचे व्यापारी प्रवेशद्वार ठरणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. पायाभूत सुविधा या आमच्यासाठी केवळ राजकारण नसून ते राष्ट्रीय धोरण आहे. कोणत्या प्रकल्पाची रखडपट्टी होणार नाही आणि ते अपूर्ण राहणार नाही याकडे केंद्र सरकारचे लक्ष राहणार

असून दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील काही राजकीय पक्ष केवळ स्वहिताचा विचार करतात. स्वत:च्या पक्षाचा आणि कुटुंबाचाच विकास कसा होईल याकडेच त्यांचे लक्ष असते. मात्र राष्ट्र प्रथम हे आमचे ब्रीद असून ‘सबका साथ- सबका विकास, सबका विश्वास- सबका प्रयास’ हा आमचा मंत्र आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक

सात दशकानंतर प्रथमच उत्तर प्रदेशला त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या आहेत. ‘डबल इंजिन’ सरकारच्या प्रयत्नामुळे उत्तर प्रदेशचे देशातील सर्वात ‘कनेक्टेड प्रदेशा’मध्ये रुपांतर होत आहे. उत्तर प्रदेशातील आणि केंद्रातील आधीच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी काहीही प्रयत्न न करता नागरिकांना वंचित ठेवले. मात्र आता उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळवत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.