नवी दिल्ली : अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात देशवासीयांनी एकजुटीने लढा देऊन युवकांचे भविष्य अधिक सक्षम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीला विळखा घालत नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला भोगावे लागतात, असे मोदी यांनी सांगितले.
‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोदी यांनी अंमली पदार्थांविरोधातील अभियानात युवकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हे अभियान केवळ औपचारिकता न राहता लोकसहभागाचे आंदोलन बनत असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवणे आणि त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे नेणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
३५ लाख महिलांना बळ
‘पीएम स्वनिधी’च्या लाभार्थ्यांपैकी सुमारे ४६ टक्के महिला असून, देशभरातील सुमारे ३५ लाख महिला या योजनेशी जोडल्या गेल्याचे मोदी यांनी नमूद केले. १०८ देशांतील १२ हजार मुली अंतराळ तंत्रज्ञान शिकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छोट्या प्रयत्नांच्या प्रेरणादायी कथा मुंबईतील कृष्णा शेषाद्री यांनी भारतातील पूर्वीच्या छोट्या-मोठ्या संस्थानांची माहिती देणारी ‘भारत राज्य’ ही वेबसाइट सुरू केल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. नागालँडमधील पेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांनी फुलशेतीतून साधलेले यश आणि ओडिशातील मैथिली भुई यांनी वनसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचाही त्यांनी गौरव केला.
