केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “करोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि हात धुणं हाच आहे. याचाच वापर करून सार्वजनिक ठिकाणी या उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिमेची सुरूवात करण्यात येणार आहे,” असं जावडेकर म्हणाले. “करोना काळात घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. औषधं आणि लसीशिवाय मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुत राहणं हे करोनाविरोधातील कवच आहे. या मोहिमेंअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
“हिवाळ्याच्या कालावधीत नागरिकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावले जातील. बस स्थानक, विमानतळ यांसारख्या ज्या ज्या ठिकाणी लोकं संपर्कात येतात, अशा ठिकाणी हे फलक लावण्यात येणार आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील करोनाबाधितांच्या संख्येनंही आता ६७ लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही आता १ लाखाच्या वर गेली आहे.