PM Narendra Modi New Zealand Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारताला जागतिक गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र म्हणून सादर केलं. भारत ही ‘केवळ एक बाजारपेठ नसून जागतिक विकासासाठी एक लाँचपॅड’ असल्याचं त्यांनी न्यूझीलंडच्या व्यावसायिक समुदायाला सांगितलं. ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशांनी आर्थिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा (रोडमॅप) जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षांत न्यूझीलंडला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होईल, मोदींचा विश्वास
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान ‘भारत-न्यूझीलंड बिझनेस अँड स्पोर्ट्स एंगेजमेंट’ कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अवघ्या नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झालेला हा मुक्त व्यापार करार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सेवा आणि कौशल्य गतिशीलता (टॅलेंट मोबिलिटी) या क्षेत्रांमध्ये नवीन संधींचे दरवाजे उघडेल. २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था
तसंच, न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला. “ही केवळ गुंतवणूक नसून भारताच्या विकास प्रवासाचा भाग बनण्याची वचनबद्धता आहे”, असं सांगत पंतप्रधानांनी भारताचं वर्णन जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून केलं; जी झपाट्याने विस्तारणारा मध्यमवर्ग, डिजिटल परिवर्तन आणि पायाभूत सुविधांच्या अवाढव्य विकासामुळे पुढे जात आहे.”
“आम्ही ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ (सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन) हा प्रशासनाचा पाया बनवला आहे. आज भारत धोरणात्मक स्थैर्य, राजकीय स्थैर्य आणि विकासातील सातत्य प्रदान करतो. म्हणूनच जगाला आमचा संदेश स्पष्ट आहे, भारत केवळ एक बाजारपेठ नाही, तर भारत जागतिक विकासासाठी एक लाँचपॅड आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक केंद्र म्हणून सादर करताना पंतप्रधानांनी शहरी पायाभूत सुविधांमधील संधींवर प्रकाश टाकला.
‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत १०० शहरांमध्ये ८,००० पेक्षा जास्त प्रकल्प राबवले जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी न्यूझीलंडच्या कंपन्यांना भारतातील शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी), पाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत भागीदारी करण्याचे आमंत्रण दिले. तसंच न्यूझीलंडच्या विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस (शाखा) सुरू करण्यासाठी आमंत्रित केलं. पंतप्रधानांनी ‘माओरी’ (Maori) व्यावसायिक नेत्यांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, भारताची सांस्कृतिक मूल्ये आणि माओरी परंपरांमध्ये निसर्ग, समुदाय आणि शाश्वततेबद्दल (सस्टेनेबिलिटी) नितांत आदर आहे. या भागीदारीला अधिक समावेशक आणि शाश्वत बनवण्यासाठी या मुक्त व्यापार करारात (FTA) माओरी व्यवसायांसाठी संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
