PM Narendra Modi Norway visit: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार केला जातो. माध्यमांकडून देखील यावर भाष्य केले जाते. पंतप्रधान मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. नॉर्वेत देखील त्यांना पत्रकांरकडून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, पंतप्रधान मोदी प्रश्न न घेता निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ एका पत्रकार महिलेने समाज माध्यमावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या व्हिडीओच्या संदर्भाने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नॉर्वे दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नॉर्वे दौऱ्यावर आहेत. सोमवारी मोदी नॉर्वेत दाखल झाले. यावेळी पंतप्रधान योनास गहर स्टोअर यांनी त्यांचे ओस्लो विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला. हा नॉर्वेतील सर्वोच्च सन्मान असून, पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३२ वा जागतिक सन्मान आहे. मोदींनी यावेळी पश्चिम आशिया आणि युक्रेन संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले. लष्करी कारवाईने शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले.
प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ समोर
नॉर्वेत एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांना महिला पत्रकाराने काही प्रश्न घेण्याची विनंती केली. दरम्यान, पंतप्रधान याकडे लक्ष न देता सभागृहातून बाहेर गेले. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, आणि मला तशी अपेक्षाही नव्हती. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर असून पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती व क्युबा यांच्याशी स्पर्धा करत आहे. ज्या शक्तींशी (देशांशी) आपण सहकार्य करतो, त्यांना प्रश्न विचारणे हे आपले कर्तव्य आहे”, अशी पोस्ट आणि नरेंद्र मोदींचा व्हिडिओ या महिलेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केली आहे.
राहुल गांधींची टीका
राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे. जेव्हा लपवण्यासारखं काहीच नसतं, तेव्हा भीती बाळगण्यासारखंही काही नसतं. जेव्हा जग एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांना घाबरलेलं आणि काही प्रश्नांपासून पळ काढताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेचं काय होतं?, अशा शब्दात टीका करत राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला.

व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिला पत्रकार कोण आहेत?

मोदींना प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर शेअर केलेल्या महिला पत्रकाराचे नाव हेले लिग असे आहे. त्यांच्या एक्सवरील बायोनुसार, त्यांनी पूर्वी अमेरिकेत वार्ताहार म्हणून काम केले असून, सध्या एका नॉर्वेजियन वृत्तपत्रात कार्यरत आहेत.
