नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर (PM Narendra Modi in Europe) जात असताना, युक्रेनमधील वैर थांबावे आणि येथील संघर्षांवर संवाद व राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा, असे आवाहन भारताने रविवारी केले.

युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेचे ‘संदर्भ, स्पष्टता, महत्त्व आणि सकारात्मक आयाम’ नवनियुक्त परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी अधोरेखित केले आणि याबाबत कुणालाही संभ्रम असू नये असे सांगितले.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच, यावर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यावर मोदी हे सोमवारपासून जर्मनी, डेन्मार्क व फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.

व्यापार व गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि संरक्षण यांसाह अनेक क्षेत्रांत तीन युरोपीय देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर पंतप्रधानांच्या भेटीत लक्ष केंद्रित केले जाईल. प्रादेशिक व जागतिक घडामोडींबाबतच्या चर्चेचा भाग म्हणून युक्रेनचा मुद्दाही उपस्थित होईल, असे परराष्ट्र सचिव म्हणाले.

युक्रेनबाबत भारताची भूमिका त्याच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी समजून घेतली असून, त्यांनी तिची प्रशंसा केली आहे, असे क्वात्रा यांनी सांगितले.

मोदी यांच्या दौऱ्यात ऊर्जा सुरक्षेबाबतची चर्चा हा चर्चेचा एक मुख्य भाग असेल, कारण सध्याच्या परिस्थितीत या मुद्याला मोठे महत्त्व आले असल्याचेही क्वात्रा म्हणाले.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे, ऊर्जेसाठी युरोपचे रशियावरील अवलंबित्व संपवण्याबाबत युरोपमध्ये व्यापक प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शूल्झ हे सोमवारी ‘इंडिया- जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स’ (आयजीसी) चे संयुक्त अध्यक्षस्थान भूषवतील, असे क्वात्रा यांनी सांगितले. यानंतर होणाऱ्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत मोदी आणि   शूल्झ हे दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.