Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली. एवढंच नाही तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.

दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर अखेर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं. त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते.

तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांना सांगितलं की, “पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल”, असं पंतप्रधान मोदींनी जेडी व्हान्स यांना सांगितलं. संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

‘जर तिकडून गोळ्या चालवल्या तर इकडून…’

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामाच्या घोषणनेनंतर रविवारी समोर आलेल्या तपशीलानुसार, ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कारवाई केल्यानंतर सरकारकडून लष्कराला काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तानने आगळीक केली तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मोदींनी लष्कराला दिल्या होत्या. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, ‘जर तिकडून गोळ्या चालवल्या तर इकडून गोळे चालतील’, असा इशारा मोदींनी दिला होता.