PM Narendra Modi On Nitin Nabin BJP President : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात ही अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर नितीन नबीन यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिकपणे सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आदी दिग्गज उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘मी कार्यकर्ता आणि नितीन नबीन माझे बॉस आहेत’, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी नितीन नबीन यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी यांच्यासह आमच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपाचं संघटन मजबूत केलं. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवलं होतं. त्यानंतर अमित शाह यांच्या नेतृत्वात देशातील अनेक राज्यात भाजपा सरकार सत्तेत आलं आणि केंद्रात देखील दुसऱ्यांदा सरकार बनलं. त्यानंतर जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष पंचायतपासून ते थेट संसदेपर्यंत आणखी मजबूत झाला. त्यानंतर केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपा आणि एनडीएचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे भाजपाच्या आतापर्यंत झालेल्या सर्व अध्यक्षाचं आणि त्यांच्या योगदानाबाबत आभार व्यक्त करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आज भारतीय जनता पक्षाचा जेवढा फोकस संघटन मजबूत करण्यात आणि वाढवण्यासाठी आहे, तेवढाच फोकस कार्यकर्त्यांच्या निर्माणासाठी देखील आहे. भाजपा हा एक असा पक्ष आहे की जिथं लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. ५० वर्षांपेक्षा कमी वय असताना मुख्यमंत्री देखील झाले होते. मात्र, हे सगळं ज्या-त्या जागेवर आहे. या सगळ्यापेक्षा माझ्या जिवनात जास्त मोठी गोष्ट म्हणजे मी त्या आधी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि याचा मला सर्वाधिक अभिमान आहे. आता जेव्हा पार्टीच्या थीमचा विचार केला जातो, तेव्हा मी एक कार्यकर्ता आहे आणि नितीन नबीन हे माझे बॉस आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आता नितीन नबीन हे आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष आहेत. आता त्यांचं कर्तव्य फक्त भाजपालाच सांभाळणं एवढंच नाही तर एनडीए आणि भाजपामधील समन्वय साधण्याचं काम देखील पाहावं लागतं”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहेत नितीन नबीन?
१) नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० ला बिहारमधील पाटणा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते.
२) नितीन नबीन यांनी २००६ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बांकीपूर येथून पोटनिवडणूक लढवली आणि ते आमदार झाले.
३) २०१०, २०१५ आणि २०२० या तिन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीतही ते पाचव्यांदा आमदार झाले. बांकीपूर मतदार संघात त्यांना ९८ हजार २९९ मतं मिळाली.
४) २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीन नबीन यांना नितीश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं.
५) नितीन नबीन हे सध्या बिहारचे बांधकाम मंत्री आहेत.
६) २०२१ ते २०२२ या कालावधीतही ते याच विभागाचे मंत्री होते.
७) नितीन नबीन यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
