PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’च्या (एसआरसीसी) शताब्दी महोत्सवाला हजेरी लावली. ‘एसआरसीसी’च्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शिक्षक दिनाचं औचित्य साधून आयोजित या शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. जीडीपीवरून सरकारवर होणाऱ्या टीका, दहशतवादाचा मुद्दा, माओवादी, नक्षलवादी, दहशतवाद अशा विविध मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. याच कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा अप्रत्यक्ष मोठा इशारा दिला आहे.
“पाकिस्तानने जर काही कुरापती केल्या, तर भारतीय सैन्य घरात घुसून प्रहार करतं”, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
#WATCH | Delhi: At the centenary celebrations of Shri Ram College of Commerce (SRCC), Prime Minister Narendra Modi says, "Today, those spreading terrorism are on the back foot. If Pakistan indulges in any misadventure, India's armed forces enter their territory and strike. Peace… https://t.co/b56UnhA1Tw pic.twitter.com/WhjSH8mNZf
— ANI (@ANI) September 5, 2026
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारत सक्षम आहे. दहशतवाद पसरवणारे सध्या बॅकफूटवर आहेत. मात्र, पाकिस्तानने जर काही नापाक कृत्य केलं, तर भारतीय सैन्य घरात घुसून प्रहार करतं. जम्मू-काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत सध्या शांतता वाढली आहे. माओवादी, दहशतवाद आणि नक्षलवादाची कंबर मोडली गेली आहे. एकेकाळी भारताच्या धोरणात्मक पद्धतीबद्दल चिंता व्यक्त करणारे जग आज भारताच्या धोरणात्मक गतिमानतेबद्दल चर्चा करत आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींचा दिल्ली मेट्रोतून प्रवास
दिल्लीतील ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’च्या (एसआरसीसी) शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. नेहमीच्या व्हीआयपी ताफ्याऐवजी हातात मेट्रो कार्ड घेऊन सर्वसामान्यांप्रमाणे डब्यात शिरलेल्या पंतप्रधानांना पाहून सहप्रवाशांनाही धक्का बसला. या प्रवासादरम्यान मोदींनी मेट्रोतील नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.
१३ वर्षांनंतर महाविद्यालयात परतले
पंतप्रधान मोदी तब्बल १३ वर्षांनंतर ‘एसआरसीसी’मध्ये पुन्हा आले आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती. तत्पूर्वी शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच यंदा एप्रिल महिन्यात महाविद्यालयाच्या नियामक मंडळाने पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एसआरसीसीच्या १०० वर्षांच्या प्रवासाची नोंद घेणाऱ्या एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं होतं.
