भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. छातीत दुखू लागल्या सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळला. भारताचं परराष्ट्र धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्यकाळातील केलेल्या अनेक महत्वाच्या कामांबद्दलही मोदींनी यावेळी सर्वांना आठवण करुन दिली.

स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षांमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.