scorecardresearch

Mann Ki Baat : मोदींकडून नाशिकच्या चंद्रकिशोर पाटलांसह उस्मानाबादमधील हातमागाच्या वस्तूंचं तोंडभरून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या कामाची दखल घेत कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत कौतुक केलं आहे. चंद्रकिशोर पाटील गोदावरी नदीच्या काठावर उभे राहून लोकांनी नदीत कचरा टाकू नये म्हणून प्रयत्न करतात. यासाठी ते दिवसभरातील खूप वेळ खर्च करतात, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. तसेच उस्मानाबादच्या हातमाग वस्तूंचा उल्लेख करत या वस्तू परदेशात निर्यात होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी जोडलेला आहे. मन की बातमध्ये आपण नेहमी स्वच्छतेचे प्रयत्न जरूर सांगतो. अशाच एका स्वच्छताप्रेमीचं नाव चंद्रकिशोर पाटील असं आहे. ते महाराष्ट्रातील नाशिकमध्ये राहतात. त्यांचा स्वच्छतेचा संकल्प खूप दृढ आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात आणि लोकांना सातत्याने नदीत कचरा न टाकण्यासाठी प्रेरणा देतात.”

“कोणीही नदीत कचरा टाकताना दिसलं की ते त्याला विरोध करतात. या कामासाठी चंद्रकिशोर पाटील आपला खूप वेळ खर्च करतात. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडे नदीत फेकला जाणार होता अशा कचऱ्याचा ढिग तयार होतो,” असं मोदींनी सांगितलं.

हेही वाचा : “सर्व मराठी बंधू भगिनींना…”, पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा

“उस्मानाबादमधील हातमागाच्या वस्तू परदेशात निर्यात”

मोदी म्हणाले, “देशातील कानाकोपऱ्यात तयार झालेले नवनवे उत्पादन परदेशात जात आहे. आसाममधील हेलाकांडीचे लेदर प्रोडक्ट असो की उस्मानाबादच्या हातमागाच्या वस्तू (handloom product), बीजापूरची फळं-भाज्या असो की चंदोलीचा काळा तांदूळ (black rice) या सर्व वस्तूंची निर्यात होत आहे. हिमाचल, उत्तराखंडमध्ये उत्पादित मिलेट्सची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात झाली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातील बंगनपल्ली आणि सुवर्णरेखा आंबा दक्षिण कोरियाला निर्यात झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi praise nashik cleaning activist chandrakishor patil and osmanabad handloom pbs

ताज्या बातम्या