टोक्यो : जपानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार असल्याचे नमूद करून भारताच्या विकासात जपानी गुंतवणुकीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे प्रतिपादन केले.

मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनिवासी भारतीयांपुढे केलेल्या भाषणात भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानच्या गुतंवणूकदारांनी दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले.  जपानशी भारताचे नाते अध्यात्माचे, सहकार्याचे,आपुलकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतात पायाभूत सुविधा आणि क्षमता विकासाचा वेग विलक्षण असून जागतिक समुदाय त्याचा साक्षीदार असल्याचेही ते म्हणाले.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या निमंत्रणावरून ‘क्वाड’ परिषदेसाठी मोदी जपानच्या दौऱ्यावर असून ‘क्वाड’ देशांच्या प्रमुखांशी ते स्वतंत्र द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर आज, मंगळवारी मोदी आणि किशिदा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल.

भारतात पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता निर्माण करण्यात करण्यातील जपान हा महत्त्वाचा भागीदार असल्याचे मोदी म्हणाले. त्यासाठी त्यांनी जपानच्या सहाकार्याने उभारण्यात येणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली-मुंबई औद्योगिक महामार्ग, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स या प्रकल्पांचे दाखले दिले. 

मोदी म्हणाले, भारताचे जपानशी नाते हे बुद्धाचे, ज्ञानाचे आणि ध्यानाचे आहे. आजच्या जगाने बुद्धाने दाखवलेला मार्ग अनुसरण्याची आवश्यकता आहे. िहसा, अराजकता, दहशतवाद आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांपासून मानवतेला वाचवण्यासाठी बुद्धाचा मार्ग हाच एकमेव मार्ग आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

गेली दोन वर्षे ज्या पद्धतीने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली ते पाहता संपूर्ण प्रकार संशयास्पद होता. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही त्यावर ‘आत्मनिर्भर भारत’ हा उपाय योजला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हा आमचा संकल्प केवळ भारतासाठीच नाही, तर स्थिर आणि शाश्वत जागतिक साखळी पुरवठय़ासाठी ही खूप मोठी गुंतवणूक आहे, असे मोदी म्हणाले.        

भारताने नेहमीच प्रत्येक प्रश्नावर उपाय शोधला आहे, मग तो कितीही मोठा असो. करोना विषाणू साथीच्या काळात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारताने कोटय़वधी नागरिकांना भारतात बनलेल्या (मेड इन इंडिया) लसी दिल्या. इतकेच नव्हे तर १०० हून अधिक देशांनाही भारताने लस पुरवली, असेही मोदी म्हणाले.

आरोग्य पायाभूत सेवाक्षेत्राला मजबूत करण्यासाठी भारत काम करीत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, की आरोग्यसेवा देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवण्यासाठी ‘वेलनेस सेंटर्स’ विकसित केली जात आहेत. हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भाराताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. तसेच २०३०पर्यंत आपल्या उर्जेची ५० टक्के गरज अ-जीवाश्म क्षमतेद्वारे पूर्ण करण्याचे लक्ष्यही भाराताने ठेवले असल्याचे मोदी यांनी सांगितले. जपानमध्ये वर्षांनुवर्षे राहूनही आणि जपानी संस्कृती अंगिकारूनही भारतीय संस्कृती, भाषेवर निष्ठा ठेवणाऱ्या तेथील भारतीयांचे मोदी यांनी तोंडभर कौतुक केले.

—-

भारत अमेरिकेत गुंतवणूक करार

कर्ज, इक्विटी गुंतवणूक, गुंतवणूक हमी, गुंतवणूक विमा आणि संभाव्य प्रकल्प व अनुदानांसाठी व्यवहार्यता अभ्यास यांसारख्या अतिरिक्त गुंतवणूक साहाय्य कार्यक्रमांना गतिमान ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिकेने सोमवारी गुंतवणूक प्रोत्साहन करार (आयआयए) केले. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यात  होणाऱ्या द्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय ‘डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन’ (डीएफसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट नॅथन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारत चलो, भारत से जुडो

‘भारत चलो, भारत से जुडो’ अभियानात जपानमधील भारतीयांनी सामील व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विकास प्रकल्प, पायाभूत सेवा, शासन, हरित विकास आणि डिजिटल क्रांती आदी क्षेत्रात सरकारने केलेले कार्य अधोरेखित करताना मोदी यांनी जपानमधील भारतीयांना भावनिक साद घातली. 

प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी जपानला भेट द्यायला हवी, असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. आज मी म्हणेन की, प्रत्येक जपानी व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी भारताला भेट द्यायला हवी. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान