संसदेत विरोधकांकडून घालण्यात येणारा गोंधळ आणि वारंवार सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते गुरूवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मोदींनी गांधी घराण्यासाठी दैवतासमान असणाऱ्या राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या विधानाचे दाखले देत सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणण्याचा विरोधकांवर सडकून टीका केली. गेले काही दिवस संसदेत जे काही घडत आहे त्यामुळे देश चिंतेत आहे. संसदेचे कामकाज चालत नाही तेव्हा फक्त सत्ताधारी पक्ष आणि देशाचेच नुकसान होते असे नाही. उलट यामुळे स्वत:चे म्हणणे मांडता न आल्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांचे आणि पर्यायाने विरोधी पक्षाचेच अधिक नुकसान होते, असे मोदींनी म्हटले.
विरोधी पक्षातील सामर्थ्यवान नेत्यांना पुढे येऊ न देण्यासाठीच सभागृहाचे कामकाज चालून देत नसल्याचा आरोपही यावेळी मोदींनी केला. विरोधी पक्षातील अनेकजण चांगले बोलतात, उत्तमप्रकारे विचार मांडतात. मात्र, याविषयी वाटणाऱ्या न्यूनगंडामुळेच विरोधकांमधीलच काहीजण गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडत असल्याचे मोदींनी सांगितले.
काही लोकांचे फक्त वय वाढते, परंतु समज वाढत नाही. त्यांना काही गोष्टी कितीवेळाही सांगितल्या तरी लवकर समजत नाहीत. काही समजतात पण खूप वेळ लागतो. त्यामुळे ते सतत वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करत राहतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला. भाजप राबवित असलेल्या अनेक योजनांचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचे राहुल गांधींनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी म्हटले की, तुमच्या इतक्या वर्षातील अपयश आणि नाकर्तेपणामुळेच आम्हाला ही कामे करावी आहेत.
संसदेत मतं मांडली जातात, टोकाची प्रत्युततरं दिली जातात, जिथे सरकारवर टीका केली जाते, सरकारला टीकेला प्रत्युत्तर द्यावे लागते, याठिकाणी कोणाचाही मुलाहिजा बाळगला जात नाही. मात्र, संसदेच्या प्रतिमेला तडा जाऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी, या राजीव गांधींच्या विधानाचा दाखला देत मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. यावेळी मोदींनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांना महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
* महिला दिनानिमित्त फक्त महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात यावी
* एका आठवड्यात फक्त पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना बोलण्याची संधी द्यावी
* तसेच एकदा केवळ शाश्वत ऊर्जा (सस्टेनेबल एनर्जी) विषयावर चर्चा करण्यात यावी
* गेल्या १४ वर्षांत मी टीकेचा सामना कसा करायचा हे शिकलो आहे.
* काँग्रेसने गेल्या ६० वर्षात गरिबांना खरचं मदत केली असती तर देशात आजपर्यंत कोणीही गरीब राहिले नसते.
* काहीजण मेक इन इंडिया योजनेची खिल्ली उडवतात. मात्र, त्यांनी हे ध्यानात ठेवावे की, ही योजना भारतासाठी आहे.
* जीएसटी विधेयक तुमचेच आहे आणि तुम्हीच आता त्याला विरोध करत आहात.