PM Narendra Modi in Rajya Sabha: “गेल्या २५ वर्षांपासून विरोधक मला शिव्या देत आहेत. माझ्यासाठी हा अनुभव खूप जुना आहेत. २०१४ नंतर मी संसदेत आलो, पण त्यापूर्वीपासूनही मला शिव्या दिल्या जात होत्या. २००२ मध्ये काँग्रेस विरोधात होती. २००४ नंतर ती सत्तेत आली आणि २०१४ नंतर पुन्हा विरोधात गेली. या संपूर्ण काळात मला सातत्याने शिव्या दिल्या जात आहेत. एकाने मला विचारले की, तुमच्या चांगल्या आरोग्याचे रहस्य काय आहे? त्यावर मी उत्तर दिले, ‘मी रोज दोन किलो शिव्या खातो, म्हणूनच मी स्वस्थ आणि तंदुरुस्त आहे,’” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (५ फेब्रुवारी) राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
राज्यसभेतील भाषणात रील्सचा उल्लेख
विविध योजनांची अंमलबजावणी कशी करावी हे आम्ही दाखवून दिले आहे. रेल्वे असो, रस्ते असोत, सिंचन प्रकल्प असोत किंवा ग्रामीण विकासाची कामे असोत. विकासकामांची अंमलबजावणी कशी प्रभावीपणे केली जाते, हे आम्ही करून दाखवले आहे. आमच्या प्रयत्नांमध्ये या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, जम्मू–उधमपूर–श्रीनगर–बारामुल्ला रेल्वे प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. सध्या बर्फाच्या दाट चादरीत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत, ‘चूक करू नका, हा भारत आहे.’ या रील्स मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असून, भारताच्या पायाभूत सुविधांतील प्रगतीचे हे एक महत्त्वाचे उदाहरण असल्याचे सांगितले जात आहे.” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा राज्यसभेत आले तेंव्हा सत्ताधारी खासदार आणि आणि मंत्र्यांनी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या.
भारताच्या बाजूने झुकते माप
भाषणात मोदी म्हणाले, “आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात सहाव्या क्रमांकावर होता. मात्र काँग्रेसच्या कार्यकाळात तो ११ व्या क्रमांकावर घसरला. आता आमच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोव्हिडनंतर जगभर मोठी उलथापालथ झाली असून अनेक देश अजूनही पूर्णपणे सावरलेले नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली जागतिक व्यवस्था आता बदलत असून नवी वर्ल्ड ऑर्डर आकार घेत आहे. या सर्व घडामोडींकडे निष्पक्षपणे पाहिल्यास झुकते माप भारताच्या बाजूने असल्याचे दिसते”.
भारत आता जगासोबत स्पर्धा करू शकतो
भारत आज ‘विश्वमित्र’ म्हणून उदयास आला असून जागतिक कल्याणासाठी आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत आहे. आम्ही नऊ देशांशी विविध करार केले असून काही जण थकून बाजूला झाले असले तरी त्यांना देशाची अशी अवस्था का केली की जग भारताकडे पाहायलाही तयार नव्हते, याचे उत्तर द्यावे लागेल, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. भारत आता सक्षम झाला असून जगाशी स्पर्धा करण्याची पूर्ण क्षमता त्याच्यात आहे, असेही मोदी यांनी राज्यसभेतील भाषणात स्पष्ट केले.

