PM Modi Australia Visit Death Threat Investigation: पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस चौकशी करत आहेत. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ने सदर वृत्त दिले आहे. या प्रकरणावर अद्याप केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
९ जुलै रोजी मेलबर्नच्या मार्व्हल स्टेडियममध्ये “मेलबर्न मीट्स मोदी” या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी फेसबुकवर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टखाली आलेल्या कमेंटमध्ये कथित धमकी देण्यात आली.
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सदर कमेंट ‘अबू मुस्तफा’ नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आली होती. “त्या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत झाकून घ्या, नाहीतर ते त्यांच्या मृत्यूसाठी ऑस्ट्रेलियाला येत आहेत, असे समजा”, अशा आशयाची कथित कमेंट असल्याचे समोर आले आहे.
ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ही टिप्पणी ऑनलाइन दिसताक्षणीच हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या वृत्तात पुढे म्हटले की, अधिकाऱ्यांना त्या कमेंटशी संबंधित आयपी ॲड्रेस मिळाला आहे. कमेंटकर्त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचाही तपास केला जात आहे.
ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी अद्याप या तपासावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्रप्रमुखांचा नियोजित दौरा असेल आणि त्यांना उद्देशून धमकी प्राप्त झाल्यास ऑस्ट्रेलियन कायद्यांतील तरतुदीनुसार अशी प्रकरणे गांभीर्याने घेतली जातात. विदेशातील मोठे नेते दौऱ्यावर येत असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी विविध यंत्रणाकडे दिली जाते. यात ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांचा समावेश असतो.
कसा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा?
भारताचे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी या ६ दिवसीय दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. हा दौरा ६ जुलैपासून सुरू होऊन ११ जुलै रोजी न्यूझीलंडमध्ये संपणार आहे.
८ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया
पंतप्रधान मोदी ८ जुलै रोजी मेलबर्नमध्ये दाखल होतील. येथे ते तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतील. तसेच ते ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडलाही भेट देणार आहेत.
