वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकशाही ही भारताच्या नसानसांमध्ये वाहत असून ती आपली संस्कृती आहे. गेल्या अनेक शतकांपासून लोकशाही आपल्या कार्यशैलीचे अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया – द मदर ऑफ डेमोक्रसी’ या पुस्तकाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, की नैसर्गिकरीत्याच आपला समाज लोकशाहीवादी आहे. लोकशाहीची मातृभूमी या नात्याने आपण तिच्या मूल्यांबाबत नेहमी चर्चा केली पाहिजे आणि जगालाही ज्ञान दिले पाहिजे. यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल. इंडियन काऊंसिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चने हे पुस्तक संपादित केले असून त्यात जुन्या काळापासून देशात असलेल्या लोकशाही मूल्यांबाबत लेखांचा त्यात समावेश आहे.