Red Fort Delhi Explosion Updates: राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्थानकाबाहेर हा स्फोट झाला असून त्यात आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त होत असून स्फोटामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हा दहशतवादी हल्ला होता का? या अनुषंगाने तपास यंत्रणा तपास करत असून स्फोटाचं कनेक्शन सोमवारी सकाळी दिल्लीजवळ सापडलेल्या २९०० किलो स्फोटकांशी लावलं जात आहे. सध्या दिल्ली स्फोटाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भूतान दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान भूतानमधील उच्चपदस्थांशी त्यांच्या सविस्तर बैठका होणार आहेत. आज भूतानचे राजे जिगमे खेसर यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारत व भूतान यांच्यातील संबंधांबाबत भूमिका मांडली. मात्र, त्याचवेळी त्यांच्या भूतान दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेवरदेखील मोदींनी भाषणादरम्यान भाष्य केलं.
दिल्ली स्फोटावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये केलेल्या भाषणात दिल्ली स्फोटावर शोक व्यक्त केला. तसेच, या कट-कारस्थानामागील व्यक्तींना भारत सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असं ते म्हणाले. “भूतानमध्ये आज या प्रसंगी सहभागी होणं भारत व माझी बांधिलकी होती. पण आज मी इथे खूप भावनिक होऊन आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह घटनेनं सगळ्यांना दु:खी केलं आहे. मी पीडित कुटुंबीयांचं दु:ख समजू शकतो. आज आख्खा देश त्यांच्यासोबत उभा आहे”, असं मोदी म्हणाले.
“मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व यंत्रणा, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या संपर्कात होतो. चर्चा चालू होती. माहितीची देवाण-घेवाण चालू होती. आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील. हे कारस्थान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. जे कुणी या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना अद्दल घडवली जाईल”, असा ठाम निर्धार यावेळी नरेंद्र मोदींनी बोलून दाखवला.
दिल्लीत नेमकं घडलं काय?
राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे हादरली. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ एका ह्युंदाई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे मोठा आगीचा भडका उडाला. त्यामुळे या कारच्या आसपास उभ्या असलेल्या इतर काही वाहनांनादेखील आग लागली. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे ऐन संध्याकाळी या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच हा स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली.
स्फोट झाला त्या कारमध्ये तीन व्यक्ती बसल्या होत्या असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यापैकी एक व्यक्ती पुलवामातील कारचा मालक उमर नबी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. मात्र, उमरच्या कुटुंबीयांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. शिवाय, स्फोटात वापरलेली कार उमरची नसून त्याची कार त्याच्या घरीच असल्याचा दावाही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर स्फोटाचं नेमकं कारण काय ठरलं? या स्फोटामागे कोण आहे? यासंदर्भात तपास यंत्रणा सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत.
