पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या. अशोक चक्र आणि पंतप्रधान मोदींची बनावट स्वाक्षरीने व्हायरल होणारे पत्र खोटे असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे. “असे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही”, असही पीआयबीने स्पष्ट केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बनावट राजीनामा व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राजीनामा पत्रात, वैयक्तिक आणि राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. या पत्रावर अशोक चक्राचे चिन्ह आणि पंतप्रधान मोदींची बनावट स्वाक्षरी आहे. फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बनावट पत्र शेअर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्याची अफवा पसरवली जात आहे.
पीआयबीने काय स्पष्टीकरण दिले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले एक कथित राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी असे कोणतेही पत्र जारी केलेले नाही, तसेच त्यावर त्यांची स्वाक्षरीही नाही,” असे पीआयबीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. “कोणतीही माहिती अथवा वृत्त शेअर करण्यापूर्वी नागरिकांनी अधिकृत स्रोतांकडून त्याची शहानिशा करून घ्यावी”, असे आवाहनही सरकारने केले आहे.
आंदोलन काळात व्हायरल झाले होते बनावट व्हिडीओ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांनी धमकी दिल्याचे दाखवणारे छेडछाड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीआयबीने ते व्हिडिओ देखील बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत विधान केल्याचा दावा करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एआयचा वापर करुन बनवण्यात आला आहे, असे पीआयबीने स्पष्ट केले होते.
