नवी दिल्ली : समृद्ध लोकशाहीसाठी टीका ही पूर्वअट असते. पण, टीका कोण करतो, यावर ती स्वीकारायची की नाही, हे ठरवावे लागते. आपल्या व्यक्तीने टीका केली तर तिला पौष्टिक खाद्य माना. सातत्याने टीका करणाऱ्यांचा उद्देश भलताच असू शकतो. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार करण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी मोदींनी दोन तास संवाद साधला. लोकांच्या नकारात्मक टिप्पणींना कसे प्रत्युत्तर द्यायचे, या प्रश्नावर, मोदी म्हणाले की, संसदेमध्ये सत्ताधारी खासदार अभ्यासपूर्वक बोलत असतो. पण, विरोधक खोचक मुद्दे काढतात. मग, खासदार त्या मुद्दय़ांमध्ये अडकून पडतो आणि भरकटत जातो. टीका मौल्यवान असते, ती उपयुक्तही ठरते. पण, विरोधकांच्या आरोपांची पर्वा करू नका. विरोधकांमुळे विचलित न होता लक्ष्य गाठा, असा सल्ला मोदींनी दिला.
अपेक्षांचे ओझे बाळगू नका!
आई-वडील, मित्र आणि लोकांच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नका, त्यांच्या दबावामुळे दबून जाऊ नका, एकाग्र होऊन अभ्यास करा. मग, परीक्षाच नव्हे तर, आयुष्यातील कुठल्याही संकटावर मात करू शकाल. तुमच्याबद्दल बाळगलेली अपेक्षा ही ताकद समजा, असे मोदी म्हणाले. हाच मुद्दा मोदींनी उदाहरणासह स्पष्ट केला. ते म्हणाले, आम्ही राजकारणी सातत्याने निवडणूक लढवत असतो. २०० जागा जिंकल्या तर, ३०० जागा जिंकण्याचा दबाव असतो. आम्ही पराभूत होऊच नये, अशी मतदारांची अपेक्षा असते. त्यांच्या अपेक्षांना आम्हाला सामोरे जावे लागते.. क्रिकेटच्या मैदानात प्रचंड गर्दीकडून चौकार-षटकाराची मागणी होत असताना कसलेला फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार खेळत नाही, लक्ष केंद्रित करून खेळतो!
काबाडकष्ट की, चातुर्याने मेहनत?
बाटलीत दगड टाकून पाणी पिणाऱ्या कावळय़ाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. पाण्यासाठी कावळय़ाने कष्ट केलेच पण, चातुर्यही दाखवले. चातुर्याने मेहनत घेतली तर यश मिळते. केवळ काबाडकष्ट करून काहीही साध्य होत नाही, असे सांगत मोदींनी ‘स्मार्टली हार्डवर्क’चे महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले.
सामान्यांमध्येही असामान्यत्व
बहुतांश लोक सामान्य असतात, पण, अशा लोकांनी असामान्य गोष्टी केल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे सांगत मोदी म्हणाले, जगभरातील अर्थतज्ज्ञांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मक चित्र उभे केले होते. भारत हा सामान्य देश आहे. मोदींना काही कळत नाही, असे आरोप होत होते. पण, आता हेच तज्ज्ञ भारताच्या अर्थव्यवस्थेला आशेचा किरण मानत आहेत.
मोदींचे मार्गदर्शन
* आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर, वेळेचे अचूक व्यवस्थापन करावे लागते. आई दिवसभर इतकी कामे करते. ती वेळेचे गणित कसे बसवते पहा.
* काही विद्यार्थी परीक्षेत कॉपी करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या करतात. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. त्यापेक्षा ही मेहनत अभ्यासासाठी घेतली असती तर त्यांना यश मिळाले असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची परीक्षा असते. तिथे तुम्ही कसे तरणार?
* एकदा ‘रील’ बघायला लागलात की, त्यातून बाहेर पडता येते का? ‘गॅजेट’ तुम्हाला गुलाम बनवतो. तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहात. तुम्ही कुणाचे गुलाम होऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर गरजेनुसार करा. दिवसातील निर्मितीचे कित्येक तास आपण वाया घालवत असतो, ही चिंतेची बाब आहे.
* कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता गूगलवर मात करू लागली आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यातील धोका ओळखा. लोक वेगवेगळय़ा कारणांसाठी उपास करतात, तुम्ही ‘तंत्रज्ञानाचा उपास’ करा. घरातदेखील ‘तंत्रज्ञानविरहित विभाग’ तयार करा.
* देशाची संस्कृती-परंपरांबद्दल गर्व असला पाहिजे. मी ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये भाषण करताना तमीळ भाषेतील काही गोष्टी मुद्दाम सांगितल्या होत्या. तमीळ ही जगातील सर्वात जुनी आणि श्रेष्ठ भाषा आहे. वेगवेगळय़ा भाषा शिका. त्यातून आपलेपणा वाढतो.
* अनुभवविश्व व्यापक करा. परीक्षा झाल्यावर आपल्या गावाबाहेर, राज्याबाहेर जा. वेगवेगळय़ा समाजाच्या लोकांना भेटा. तिथल्या लोकांशी संवाद साधा.
शिक्षकांना सल्ला
* अलीकडे शिक्षक स्वत:मध्ये मग्न असलेले दिसतात. स्वत:मधील त्रुटींचा राग विद्यार्थ्यांवर काढतात. विद्यार्थ्यांना जिज्ञासा असते म्हणून ते प्रश्न विचारतात. जिज्ञासा हीच त्यांच्या आयुष्याची संपत्ती असते. विद्यार्थ्यांचे प्रश्न टाळू नका.