देशात नवं सरकार आल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून नवी दिल्लीतल्या संसदेच्या नव्या इमारतीत १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे. दरम्यान, आज (२ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात भाषण केलं. मोदींच्या भाषणावेळी सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मोदींनी आज दोन तासांहून अधिक वेळ भाषण केलं. मात्र ते मणिपूरविषयी काहीच बोलले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी मागणी केली की पंतप्रधानांनी मणिपूरबाबत बोलावं. गेल्या वर्षभरापासून मणिपूर धगधगतंय. मात्र, नरेंद्र मोदी अद्याप सभागृहात यावर एकही शब्द बोललेले नाहीत. त्यांनी सभागृहात या विषयावर एक अवाक्षर काढलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी मागणी केली की मोदींनी मणिपूरबाबत सभागृहात बोलावं. विरोधक म्हणाले, मणिपूर मोदींकडे न्यायाची मागणी करत आहे. मात्र मोदींनी नेहमीप्रमाणे यावेळी देखील मणिपूरवर बोलणं टाळलं. उलट त्यांनी त्यांच्या भाषणातील मुद्दे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. तर, विरोधकांनी 'We Want Justice', 'Manipur Want Justice' अशी घोषणाबाजी केली. यावर नरेंद्र मोदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना म्हणाले, "हे असंच चालू राहिलं तर आम्ही संसदीय लोकशाहीचं संरक्षण करू शकणार नाही." नरेंद्र मोदी म्हणाले, सभापतीजी सभागृहात आत्ता जे काही घडत आहे, काल जे काही घडलं, ते गांभीर्याने घेतल्याशिवाय आम्ही संसदीय लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही. आपल्याला यांच्या वागणुकीकडे बालबुद्धी म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही आणि आपण ते करू नये. म्हणून मी म्हणतोय यावर योग्य कारवाई व्हायला हवी. कारण यांचे हेतू चांगले दिसत नाहीत. यांचे हेतू पाहता मला भविष्यातला मोठा धोका दिसतोय. त्यामुळे मी देशातील नागरिकांना जागृत करू इच्छितो. हे ही वाचा >> “हिंदू समाजाविरोधातील अपमानजनक वक्तव्ये योगायोग की…”, मोदींचं काँग्रेसविरोधात सूचक विधान; म्हणाले, “देवाच्या रुपांचा…” पंतप्रधान म्हणाले, यांचं (विरोधकांचं) असत्य देशातील नागरिकांच्या विवेकबुद्धीवर संशय निर्माण करत आहे. या लोकांनी देशात असत्य पसरवून सामान्य विवेकबुद्धीच्या कानशिलात लगावण्याची निर्लज्ज कृती केली आहे. अशा प्रकारची वागणूक देशाच्या महान परंपरेवरची चपराक आहे. सभापतीजी, आता या सभागृहाची प्रतिष्ठा वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे. सभागृहात सुरू झालेल्या या वाईट परंपरेवर तुम्ही कठोर कारवाई कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ही माझ्यासह देशातील नागरिकांची आणि सभागृहातील सदस्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे.