नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदांच्या ‘वारसा करा’च्या कथित सल्ल्याचे छत्तीसगढमधील प्रचारसभेत वाभाडे काढले. काँग्रेसला सत्ता मिळाली तर आई-वडिलांकडून मिळणाऱ्या संपत्तीवरही कर लागू केला जाईल व सामान्यांची संपत्ती हडप केली जाईल, असा दावा करत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.

काँग्रेस संपत्तीचे फेरवाटप करून हिंदूंची संपत्ती, हिंदू महिलांचे सोने-मंगळसूत्र हिसकावून घेईल. तसे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याचा दावा मोदींनी राजस्थानमधील प्रचारसभेत केला होता. त्याचा संदर्भ देत बुधवारी मोदी म्हणाले की, आता काँग्रेस एक पाऊल आणखी पुढे गेला असून तुम्हाला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरही कर लादला जाणार आहे.

हेही वाचा >>> जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर

सरकारी आयुर्विमा कंपनी ‘एलआयसी’च्या घोषवाक्याचा आधार घेत प्रचासभेतील जनसमुदायाला उद्देशून मोदी म्हणाले की, तुम्ही मेहनतीने जमवलेली संपत्ती तुमच्या मुला-बाळांना मिळणार नाही. काँग्रेस सरकार ही संपत्तीही तुमच्यापासून हिरावून घेईल. काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, हाच त्यांचा मंत्र आहे! जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस अधिकाधिक कर लादून मारेल आणि तुमच्या पश्चातही तुमच्यावर वारसा कराचे ओझे लादेल, अशी टीका मोदींनी केली.

अख्खा काँग्रेस पक्ष वडिलोपार्जित संपत्ती मानून आपल्या मुलाबाळांना वारसाहक्काने दिली त्या लोकांना देशातील सामान्यांनी आपल्या मुलाबाळांना संपत्ती द्यावी हे मान्य नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला.