पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना भाषण केलं. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. काँग्रेसलाही लक्ष्य केलं. मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले तुमचं वय झालं आहे तुम्ही बसून घोषणा दिल्या तरीही चालतील. राष्ट्रपतींच्या संबोधनावर तुम्ही चर्चा होऊ देत नाही. आदिवासी कुटुंबातून आलेल्या महिला राष्ट्रपतींचा काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी अपमान केला आहे, तसंच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला संविधान हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
लोकसभेत बुधवारी एक लाजिरवाणी घटना घडली, सदनात अशा पद्धतीने वातावरण निर्माण करण्यात आलं आणि कागद अशा पद्धतीने फेकण्यात आले की ते निषेधार्ह आहे. त्यावेळी अध्यक्षस्थानी आसामचे एक सदस्य बसले होते. अशा पद्धतीने कागद भिरकावणं हा आसामचा अपमान नाही का? भूपेन हजारिका यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्याचाही विरोध करण्यात आला. या गोष्टी देश विसरणार नाही हे लक्षात ठेवा.
राहुल गांधींवर तिखट शब्दांमध्ये मोदींनी केली टीका
पंतप्रधान आपल्या भाषणात पुढे म्हणाले, काँग्रेसच्या तल्लख डोक्याचे युवराज असलेल्या माननीय खासदारांनी (राहुल गांधी) केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना गद्दार असं म्हटलं. युवराजांचा अहंकार किती पराकोटीला पोहचला आहे जरा बघा. काँग्रेस सोडून आत्तापर्यंत अनेक लोकांनी विविध पक्षांमध्ये जाणं पसंत केलं आहे. मात्र कुणालाही हे बोलले नाहीत. रवनीत सिंह बिट्टू शिख आहेत, त्यांना गद्दार म्हणणं हा शिखांचा अपमान आहे. शिखांच्या मनात काँग्रेसच्या युवराजांच्या मनात जो तिरस्कार आहे तोच पाहण्यास मिळाला. म्हणूनच असे शब्द त्यांनी वापरले असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका केली.
शिख समुदायाबाबत काँग्रेसला काय वाटतं मला माहीत आहे-मोदी
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ज्यांच्या कुटुंबाने देशासाठी प्राणांचीही आहुती दिली अशा शिख कुटुंबातील व्यक्तीला गद्दार म्हणणं हे दुर्दैवी आहे. शिखांबाबत काँग्रेसला काय वाटतं ते मला ठाऊक आहे.” असंही या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
कोव्हिडनंतर देशात बरीच उलथापालथ-मोदी
आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर होता. काँग्रेसच्या कार्यकाळात तो ११ व्या क्रमांकावर गेला. आता आमच्या कार्यकाळात आपल्या देशाच्या अर्थ व्यवस्थेची वाटचाल तिसऱ्या क्रमांकावर होते आहे. कोव्हिडनंतर जगात बरीच उलथापालथ झाली. पण जग अजूनही सावरु शकलेलं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर एक वर्ल्ड ऑर्डर तयार झाली होती आता एक नवी वर्ल्ड ऑर्डर तयार होते आहे. या सगळ्या घटनांकडे निष्पक्ष पद्धतीने पाहिलं तर लक्षात येतं की झुकतं माप हे भारताकडे आहे. भारत विश्वमित्र म्हणून उदयास आला आहे. विश्व कल्याणाच्या दृष्टीने आपण आपली भूमिका बजावतो आहोत. आपण नऊ देशांशी विविध करार केले आहेत, जे लोक थकले आहेत आणि निघून गेले आहेत पण त्यांना कधी ना कधी तरी उत्तर द्यावं लागेल. त्यांनी देशाची अशी अवस्था का करुन ठेवली होती की जगातला एकही देश भारताकडे बघतही नव्हता असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसला लगावला

