राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला काँग्रेसने चारीमुंड्या चीत केले. दोन लोकसभा आणि एका विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे काँगेसच्या नेत्यांमध्ये उत्साह पसरला असून त्यांनी ‘मिशन २०१९’ची तयारी सुरू केली आहे. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हेच या विजयाचे सूत्रधार ठरले. पोटनिवडणुकीतील विजयावर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे स्मार्ट असून पराभवाची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी राजस्थानमध्ये प्रचाराला येण्याचे टाळले, असा टोला त्यांनी लगावला.

राजस्थानमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारयादीत मोदी आणि शहांचे नाव होते. पण दोघांची एकही सभा झाली नाही. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी मात्र दणकून प्रचार केला होता. ‘द वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, पायलट म्हणाले की, पंतप्रधान मोदी खूप स्मार्ट आहेत. त्यांना माहीत होतं की, भाजपाचा पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी प्रचार केला नाही. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधानांच्या नावाचा समावेश होता. पण त्यांनी प्रचार न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण ते स्मार्ट आहेत.. त्यांना माहीत होतं की, त्यांचा पक्ष पराभूत होणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

पायलट यांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हा भाजपाचा कट आहे. पक्षात सर्व काही सुरळीत सुरू असून आम्ही सर्व एक आहोत. गटबाजीचा प्रचार करणे ही भाजपाचा कट आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.

काही दिवसांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे वृत्त माध्यमांत येत आहेत. सचिन पायलट, अशोक गेहलोत आणि सी. पी. जोशी गटात पक्ष विभागला गेल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, अलवर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा काँग्रेसचे करणसिंह यादव यांनी पराभव केला. तर अजमेर मतदारसंघातून रघु शर्मा विजयी झाले. मांडलगड विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे विवेक धाकड यांनी शक्तीसिंह यांचा पराभव केला.