पीटीआय, सोमनाथ
जगातील कोणतीही शक्ती देशावर दबाव टाकू शकत नाही किंवा झुकण्यास भाग पाडू शकत नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सोमनाथ अमृत महोत्सवा’त ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी १९९८च्या पोखरण येथील आण्विक चाचणीचा संदर्भ दिला.
देशाला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी १९५१मध्ये सोमनाथ येथे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव झाल्याचे जाहीर झाले, असा दावाही पंतप्रधांनी केला. देशातील काही शक्ती तुष्टीकरणाच्या राजकारणाला अधिक प्रधान्य देत आहेत. अयाेध्येतील राम मंदिर उभारणीला झालेल्या विरोधावेळी अशी मानसिकता दिसून आली, या टीकेचाही मोदी यांनी पुनरुच्चार केला. सोमनाथ मंदिराचा अमृत महोत्सव हा केवळ भूूतकाळाचे स्मरण करणारा उत्सव नसून पुढील हजारो वर्षांसाठी प्रेरणा देणारा उत्सव असल्याचे ते म्हणाले.
११ मे ही तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. १९९८ मध्ये या दिवशी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या. भारताची क्षमता आणि सामर्थ्य आपल्या शास्त्रज्ञांनी जगापुढे सिद्ध करून दाखवले. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महापूजा व जलाभिषेक
या महोत्सवात सहभागी होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. त्यानंतर शिवमंदिरात महापूजा आणि इतर धार्मिक विधी पार पाडले. वैदिक मंत्रांच्या जयघोषात महापूजा व शिवलिंगावर जलाभिषेक केला. या विधीत देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांतून आणलेले पवित्र पाणी एका क्रेनच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावर शिंपडण्यात आले.
हवाई दलाचे कौतुक
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ पथकाचे कौतुक केले. सोमनाथ येथे आयोजित ‘फ्लायपास्ट’ दरम्यान या पथकाने दाखवलेल्या धैर्य आणि देशभक्तीच्या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे प्रत्येक मन आनंदान भरून आल्याचे त्यांनी नमूद केले.
