PM Modi speaking with Iran President Masoud Pezeshkian: पश्चिम आशियातील युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इराणी जनतेला नवरोज आणि ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच आखाती प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केला. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले हे प्रादेशिक स्थिरतेला धोका असल्याचे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. एकूण तीन मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी या संवादाची माहिती एक्सवर शेअर केली आहे. ते म्हणाले, “इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या.” या सणाच्या काळात पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदो अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आखाती प्रदेशातील प्रमुख पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या अलीकडील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. पहिल्या मुद्द्याबाबत ते म्हणाले, “मी या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करतो. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होईल आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल.”
सागरी मार्ग खुला करण्याचे आवाहन
जागतिक व्यापारासाठी जलमार्गावरून होणारी वाहतूक सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. इराण नजीक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या मुद्द्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “नौका वहन स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित असले पाहिजेत. याची खात्री आपण केली पाहिजे.”
तिसरा मुद्दा म्हणजे, युद्धकाळात इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराणने दिलेल्या पाठिंब्यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
युद्धानंतर दुसऱ्यांदा फोन
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलचे युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्यात दुसऱ्यांदा दूरध्वनीवरून चर्चा झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधताना पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
