Independence Day Updates Today: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली. बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कोलकात्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर, राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका मोदींनी मांडली.