PM Narendra Modi Speech Today : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. या विधेयकासाठी एकूण ५२८ सदस्यांनी मतदान केलं. मात्र, त्यापैकी २९८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर २३० जणांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं आणि याच मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘विरोधकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल’, असा इशारा देत मोदींनी महिला विधेयक प्रकरणी सर्व महिलांची माफी मागितली आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“मी आज महत्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. विरोधकांनी भारताच्या नारिशक्तीला रोखण्याचं काम कशा प्रकारे केलं हे संपू्र्ण भारत पाहत आहे. महिलांचं स्वप्न विरोधकांनी पूर्ण होऊ दिलं नाही. नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र, आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन अधिनियममध्ये संशोधन होऊ शकलं नाही. त्याबाबत मी सर्व महिलांची माफी मागतो”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

‘विरोधकांना पापाची शिक्षा मिळेल’ : मोदी

“महिला आरक्षणाला विरोध करून केलेल्या पापाबद्दल विरोधी पक्षांना नक्कीच शिक्षा मिळेल. या विरोधी पक्षांनी संविधान निर्मात्यांच्या भावनांचा देखील अपमान केला आहे. यासाठी जनतेकडून मिळणाऱ्या शिक्षेतून ते सुटू शकणार नाहीत”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

“नारी शक्ती वंदन दुरुस्तीचा उद्देश कोणाकडून काहीही काढून घेणं हा नव्हता, तर सर्वांना काहीतरी देणं हा होता. ही दुरुस्ती महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी होती. जे ४० वर्षांपासून प्रलंबित होतं आणि आता २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करण्यात आलं असतं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“महिला सर्व काही विसरतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाहीत. जेव्हा कधी देशातील महिला या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात पाहतील, तेव्हा त्यांना आठवेल की याच लोकांनी संसदेतील महिला आरक्षण थांबवल्याचा आनंद साजरा केला होता”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका

“आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे. मात्र, जेव्हा काही लोकांसाठी पक्षाचं हित सर्वस्व बनतं, पक्षाचं हित राष्ट्रीय हितापेक्षा मोठं ठरतं, तेव्हा त्याचा फटका महिला शक्तीला बसतो. यावेळीही तेच घडलं आहे. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिला शक्तीला सहन करावा लागला आहे”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली.

‘विरोधकांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली’ : मोदी

“काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजनीतीमुळे देशातील महिलांना नुकसान झालं आहे. देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेवर होती, देशाची नारीशक्ती पाहत होती, मलाही हे पाहून खूप दुःखं झालं की नारीहिताचा प्रस्ताव पडला तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि सपासारखी परिवारवादी पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांपासून त्यांचे अधिकार हिरावून घेत हे पक्ष बेंचवर थाप देत होते. त्यांनी फक्त बेंच वाजवले नाहीत, त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. महिला सर्व विसरू शकतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे संसदेत काँग्रेस आणि इतर पक्षांने संसेदत केलेला व्यवहार हे कधीच विसरणार नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.