PM Modi in Netherlands Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नेदरलँड्स दौऱ्यावर असून त्यांनी तिथे आज भारतीय समुदायाशी संवाद साधला. हेग येथील कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी म्हटलं की, जग अनेक आव्हानांचा सामना करत असताना भारत नवोन्मेष, आर्थिक विकास आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे.” तसंच त्यांनी या दशकाला आपत्तींचं दशक म्हणूनही संबोधलं.

आपत्तींचं दशक

“भारत ही तंत्रज्ञान आणि मानवता या दोन्हींवर आधारित संधींची भूमी आहे”, असं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, “भारत जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा पूर्ण मानवतेला त्याचा फायदा होतो. पण आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हानेही आहेत. सध्या आपण नव्या आव्हानांना तोंड देत आहोत. आधी करोना आला, मग युद्ध सुरू झाले. आता इंधन संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचं दशक बनलं आहे. आपण सर्व पाहतोय. ही परिस्थिती वेगाने नाही बदलली तर अनेक दशकांच्या कामगिरीवर पाणी फेरले जाईल. पुन्हा गरीबीच्या दलदलीमध्ये आपण ढकलले जाऊ ” अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

इंधन ते पाण्याच्या सुरक्षेसाठी एकत्र काम करू

ते पुढे म्हणाले, अशा जागतिक परिस्थितीत जग रिझिलियन्ट सप्लाय चेनची चर्चा करत आहे. तेव्हा भारत आणि नेदरलँड्स एकत्र येऊन विश्वासू, पारदर्शक, भविष्य निर्धार सप्लाय चेन बनवायला तयार आहे. इंधन सुरक्षेपासून पाण्याच्या सुरक्षेपर्यंत नेदरलँड्स आणि भारत एकत्र काम करत आहेत. ग्रीन हायड्रोजनसाठी आमचं सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. ते असंही म्हणाले की दोन्ही देश जागतिक स्तरावर अधिक जवळून एकत्र काम करू शकतात आणि मोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प मिळण्यासाठी सहकार्य करू शकतात.”

भारत आणि युरोप यांच्यातील वाढत्या आर्थिक संबंधांवर प्रकाश टाकत मोदी म्हणाले, प्रस्तावित भारत-युरोपियन यूनियन मुक्त करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. युरोपमध्ये विस्तार करू इच्छिणाऱ्या भारतीय व्यवसायांसाठी नेदरलँड्स एक नैसर्गिक प्रवेशद्वार ठरणार आहे. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात भारतीय अनिवासी भारतीयांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आणि म्हणाले की, हा समुदाय दोन्ही देशांमध्ये एका विश्वासार्ह पुलाची भमिका बजावतो आणि लोकांमध्ये संबंध आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतो.