संसदेच्या नव्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसद भवनात आता देशाचं कामकाज चालणार आहे. त्याआधी जुन्या संसदेतल्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले विचार प्रकट केले. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांना टोला लगावला. भारतावर संशय घेण्याचा एक स्वभाव अनेक लोकांचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच सुरु आहे. यावेळीही असाच संशय घेतला गेला. मात्र भारताने ताकद दाखवून दिली. आज आपण रोडमॅप घेऊन हजर आहोत. जी २० चं अध्यक्षपद नोव्हेंबर अखेरपर्यंत आपल्याकडे आहे. आज आपल्या सगळ्यांसाठी ही गर्वाची बाब आहे की आपला देश विश्व मित्राच्या रुपाने आपली ओळख तयार करतो आहे. संपूर्ण जग आपल्यात एक मित्र शोधतो आहे. वेदांपासून विवेकानंदापर्यंत जे आपले संस्कार आहेत त्या संस्काराचं हे यश आहे. सबका साथ सबका विकास या मंत्राने आपण जग जोडलं आहे. या सदनातून निरोप घेणं हा भावूक क्षण आहे. कुठलंही कुटुंबही जेव्हा जुनं घर सोडून नव्या घरात जातं तेव्हा त्यांचंही मन हेलावतं. आज आपल्या प्रत्येकाचीच अवस्था अशीच आहे. अनेक प्रकारचे अनुभव आहेत. कधी संघर्ष झाला आहे, कधी थोडेफार वाद झालेत, कधी प्रचंड उत्साहही पाहिला आहे. या सगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यामुळे या भवनाचा गौरवही आपला सगळ्यांचा आहे. स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाशी जोडलेल्या अनेक घटनांनी या सदनात आकार घेतला आहे. आज आपण हे सदन सोडून नव्या सदनात जाणार आहोत तेव्हा भारतातल्या सामान्य माणसाला जो आदर दिला आहे त्याचीही आठवण करण्याचा हा क्षण आहे. मी पहिल्यांदा जेव्हा खासदार झालो आणि संसदेत आलो तेव्हा अगदी सहजरित्या मी संसदेच्या पायरीवर आपलं डोकं टेकलं होतं. लोकशाहीच्या मंदिराला केलेला तो नमस्कार आजही माझ्या स्मरणात आहे. भारताच्या लोकशाहीची ताकद काय आहे ते मी अनुभवलं आहे. लोकांच्या श्रद्धेचं ही ताकद आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणारा एक मुलगा खासदार झाला, पंतप्रधान झाला याची मी कल्पनाही केली नव्हती. आपल्यापैकी अनेकजण आहेत जे संसदेत जे लिहिलं आहे त्याचा उल्लेख केला गेला आहे. उपनिषिदांमध्ये लिहिलं गेलं आहे की जनतेसाठी द्वार खुलं करा, आपल्या ऋषींनीही हे लिहून ठेवलं आहे. असाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.