PM Narendra Modi Speech : २१ व्या शतकाचं पहिली २५ वर्षे संपली आहेत. आता २०२६ मध्ये आपण आहोत. १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १९२५ नंतर भारत स्वतंत्र झाला पाहिजे ही मोहीम जोरदार ठरली होती. आता २०२६ मध्ये आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करत होतो. राष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला हे वाटतं आहे की आपण एका अशा वळणावर आलो आहोत की ज्याला वाटतं आहे की आपल्याला पुढे जायचं आहे मागे वळून बघायचं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलं आहे. दरम्यान विरोधक यावेळी सातत्याने मनमानी चालू देणार नाही, हुकूमशाही बंद करा, राहुल गांधींना बोलू द्या म्हणत घोषणाबाजी करत होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण सुरु ठेवलं. आपल्याला आता थांबून चालणार नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
जगातले देश आता म्हातारे होत चालले आहेत-मोदी
जगातले समृद्ध देश आता म्हातारे होत चालले आहेत. आपला देश तरुणांचा देश म्हणून उदयास येतो आहे. हा एक उत्तम योग आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहोत की जगाला भारताचं आकर्षण होतं आणि आता ते वाढतं आहे. भारताच्या बुद्धिमत्तेचं आकर्षण सगळ्या जगाला आहे. कारण आपल्याकडे युवकांची कल्पकता आहे. आपल्या देशातील तरुणांकडे संकल्प आहे आणि सामर्थ्यही आहे. भारत आज जगात जी आव्हानं निर्माण होत आहेत त्यांचं उत्तर देणारा देश म्हणून उभा राहतो आहे. आशेचा किरण म्हणजे आपला देश ठरतो आहे हा देखील एक सुयोग आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत म्हटलं आहे. देशाची प्रगती आपण वेगाने करतो आहोत.
कोव्हिडनंतर देशात बरीच उलथापालथ-मोदी
आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर होता. काँग्रेसच्या कार्यकाळात तो ११ व्या क्रमांकावर गेला. आता आमच्या कार्यकाळात आपल्या देशाच्या अर्थ व्यवस्थेची वाटचाल तिसऱ्या क्रमांकावर होते आहे. कोव्हिडनंतर जगात बरीच उलथापालथ झाली. पण जग अजूनही सावरु शकलेलं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर एक वर्ल्ड ऑर्डर तयार झाली होती आता एक नवी वर्ल्ड ऑर्डर तयार होते आहे. या सगळ्या घटनांकडे निष्पक्ष पद्धतीने पाहिलं तर लक्षात येतं की झुकतं माप हे भारताकडे आहे. भारत विश्वमित्र म्हणून उदयास आला आहे. विश्व कल्याणाच्या दृष्टीने आपण आपली भूमिका बजावतो आहोत. आपण नऊ देशांशी विविध करार केले आहेत, जे लोक थकले आहेत आणि निघून गेले आहेत पण त्यांना कधी ना कधी तरी उत्तर द्यावं लागेल. त्यांनी देशाची अशी अवस्था का करुन ठेवली होती की जगातला एकही देश भारताकडे बघतही नव्हता असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसला लगावला. तसंच भारत हा आता सक्षम देश झाला आहे. भारत जगाशी स्पर्धा करु शकतो यात काहीही शंका नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात म्हटलं आहे.

