PM Narendra Modi Speech Today : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी या विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच महिला आरक्षण सुनिश्चित करण्याचा आमचा संकल्प कायम असून हा केवळ वेळेचा प्रश्न आहे. मात्र, भविष्यात आमचा प्रयत्न थांबणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“ही फक्त वेळेची बाब आहे. महिला आरक्षण सुनिश्चित करण्याचा भाजपा आणि एनडीएचा निर्धार दृढ आणि कायम आहे. आमचा संकल्प कायम आहे. महिला आरक्षणाच्या मार्गात येणारे अडथळे आम्ही दूर करू, भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे. मात्र, जेव्हा काही लोकांसाठी पक्षाचं हित सर्वस्व बनतं, पक्षाचं हित राष्ट्रीय हितापेक्षा मोठं ठरतं, तेव्हा त्याचा फटका महिला शक्तीला बसतो. यावेळीही तेच घडलं. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिला शक्तीला सहन करावा लागला आहे”, अशी टीका मोदींनी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर केली.

‘विरोधी पक्षांसाठी संधी होती, पण त्यांनी ती गमावली’ : मोदी

“हे दुरुस्ती विधेयक सर्व पक्षांसाठी आणि राज्यांसाठी एक संधी होती. जर हे विधेयक मंजूर झालं असतं तर तमिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ आणि प्रत्येक राज्यातील जागा वाढल्या असत्या. मात्र, आपल्या स्वार्थी राजकारणामुळे या विरोधी पक्षांनी आपल्याच राज्यातील जनतेचा विश्वासघात केला. द्रमुककडे आणखी जास्त तमिळ लोकांना खासदार आणि आमदार बनवण्याची संधी होती. त्यामुळे तमिळनाडूचा आवाज आणखी मजबूत होऊ शकला असता. पण त्यांनी ती संधी गमावली. तृणमूल काँग्रेसकडेही बंगालच्या लोकांना पुढे नेण्याची संधी होती. पण तृणमूल काँग्रेसनेही ती संधी गमावली. समाजवादी पक्षाकडेही आपली महिला-विरोधी प्रतिमा उजळण्याची संधी होती. पण समाजवादी पक्षाने ती गमावली. नारी शक्ती वंदन दुरुस्तीला विरोध करून समाजवादी पक्षाने लोहियाजींची सर्व स्वप्ने चिरडून टाकली. समाजवादी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात आहे. उत्तर प्रदेशातील आणि संपूर्ण देशातील महिला हे कधीही विसरणार नाहीत”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

विरोधकांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली’ : मोदी

“काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजनीतीमुळे देशातील महिलांना नुकसान झालं. देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेवर होती, देशाची नारीशक्ती पाहत होती, मलाही हे पाहून खूप दुःखं झालं की नारीहिताचा प्रस्ताव पडला तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि सपासारखी पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांपासून त्यांचे अधिकार हिरावून घेत हे पक्ष बेंचवर थाप देत होते. त्यांनी फक्त बेंच वाजवले नाहीत, त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. महिला सर्व विसरू शकतात, पण आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे संसदेत काँग्रेस आणि इतर पक्षांने संसेदत केलेला व्यवहार हे कधीच विसरणार नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.