PM Modi CM Meeting Iran War Impact: पश्चिम आशियातील लांबलेले युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी (दि. २७ मार्च) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. ज्या राज्यांना एलपीजी गॅसचा तुटवडा अधिक भासत आहे, त्या राज्यांशीही पंतप्रधान मोदी संवाद साधतील. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पुरवठा साखळी, ऊर्जा उत्पादनांची सुरक्षा आणि विदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आव्हानात्मक असताना भारतातील सर्व राज्य आणि केंद्र यांच्यात योग्य समन्वय राखून ‘टीम इंडिया’ या भावनेला अधिक महत्त्व देण्यासाठी पंतप्रधान मोदी सदर बैठक घेत आहेत, अशी माहिती मिळत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपत्कालीन परिस्थिती आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा होऊ शकते.
कोणते राज्य बैठकीत सामील होणार नाहीत
दरम्यान ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्री आचारसंहितेमुळे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. या राज्याच्या मुख्य सचिवांशी केंद्रीय मुख्य सचिवांमार्फत वेगळी चर्चा केली जाईल. निवडणुका असलेल्या राज्यातील परिस्थितीचाही आढावा घेतला जाईल.
सध्या देशभरातील विविध राज्यांना एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. घरगुती स्वयंपाक आणि हॉटेलसाठी आवश्यक असलेला एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत.
भारताकडे ६० दिवस पुरेल इतका साठा
गुरूवारी केंद्र सरकारने स्पष्ट केले की, भारताकडे ६० दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. त्यामुळे भारताला नजीकच्या काळात कोणताही धोका नाही. तसेच भारताला होणारा इंधन पुरवठाही स्थिर आणि सुस्थितीत आहे. सध्या देशाची मागणी पूर्ण होऊ शकेल इतका साठा उपलब्ध आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, पुढच्या दोन महिन्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी वेळेपूर्वीच आयात सुरक्षित करून पुरवठ्यात सातत्य राखले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतील गंभीर परिस्थिती जोखून भारताने ४० हून अधिक देशांच्या नेटवर्कमधून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. ज्यामुळे होर्मुझमधून होणाऱ्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे.
