जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “त्यांच्या निधनामुळे मी प्रचंड दु:खी झालोय”

बिपिन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

pm narendra modi on bipin rawat demise
बिपिन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

देशाच्या तिनही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं आज तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागामध्ये एका डोंगराळ परिसरात त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये खुद्द जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या अपघातामध्ये वायुसेनेचे एक अधिकारी बचावले असून ते गंभीर जखमी आहेत. वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिपिन रावत यांच्या निधनावर देशातील सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपिन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “जनरल बिपिन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मतं आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. ओम शांती”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

IAF Chopper Crash : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ प्रवासी होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं.

घटनास्थळावरून एकूण ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उरलेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. जखमी झालेल्या व्यक्ती ८० टक्क्यांहून जास्त प्रमाणात भाजल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यामध्ये जनरल बिपीन रावत यांच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याचं अखेर जाहीर करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बिपिन रावत यांना श्रद्धांजली दिली आहे. “आज देशासाठी एक फार दु:खदायक दिवस आहे. कारण आपण एका दुर्दैवी घटनेमध्ये आपले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावलं आहे. ते सर्वात शूर सैनिकांपैकी एक होते. ज्यांनी आपल्या मायभूमीची पूर्ण निष्ठेनं सेवा केली आहे. त्यांचं योगदान आणि निष्ठा शब्दांत सांगता येत नाही. मला खूप वेदना होत आहेत”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि संरक्षण दलातील इतर ११ जणांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन होणं हे प्रचंड वेदना देणारं आहे. बिपिन रावत यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाचं आणि लष्कराचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi tweet on gen bipin rawat demise in helicopter crash pmw