नवी दिल्ली : शालेय वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या लसीकरणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे, त्यासाठी शाळांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या करोना आढावा बैठकीत केली.

करोनाच्या आपत्तीनंतर सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर देशभर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण, दिल्लीलगत असलेल्या नोएडा वगैरे भागांमधील काही शाळांमध्ये विद्यार्थाना करोनाचा संसर्ग झाला होता. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पालकांची चिंताही वाढली आहे. काही शाळांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले असले तरी, हा संसर्ग नियंत्रणात आणला गेला आहे. शालेय विद्यार्थ्यांचे सुरू झालेले लसीकरण ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. या वर्षी मार्चमध्ये १२ ते १४ वर्षांमधील मुलांसाठी लसीकरण सुरू झाले. आता ६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी कोव्हॅक्सिन लशीला परवानगी देण्यात आली आहे. पात्र मुला-मुलींचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षक, पालक आणि अन्य नागरिकांनीही लसीची वर्धक मात्रा घेतली पाहिजे.

करोनाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम केल्याबद्दल मोदींनी सर्व मुख्यमंत्री व प्रशासकीय-आरोग्य अधिकाऱ्यांचे कौतुक केले. करोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रतिदिन ३ लाख रुग्णवाढ झाली होती. ही रुग्णवाढ नियंत्रणात आणत राज्य सरकारांनी आर्थिक-सामाजिक व्यवहारांना चालना दिली. निर्बंध लागू करताना अर्थकारणाला गती देण्याचे संतुलित धोरण राज्यांना यापुढेही कायम ठेवावे लागेल. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच त्याचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर भर दिला पाहिजे, असे मोदी म्हणाले.

गेल्या दोन आठवडय़ांमध्ये काही राज्यांमध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. करोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. ओमायक्रॉन आणि त्याचे उप-उत्परिवर्तक (सब-व्हेरिएंट) कधीही गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात, याचा अनुभव युरोपमधील देशांनी घेतलेला आहे. काही देशांमध्ये उप-उत्परिवर्तकांमुळे पुन्हा करोनाची लाट उसळली. या देशांच्या तुलनेत भारतात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे. तरीही, काही राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून सरकार-प्रशासनांना दक्ष राहण्याची गरज आहे, असा इशारा मोदींनी दिला.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत कुठल्याही राज्यामध्ये परिस्थिती आटोक्याबाहेर गेली नाही. करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेमुळेही लाट नियंत्रणात ठेवता आली. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये भौगोलिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी, लोकांपर्यंत लस पोहोचवली गेली. ९६ टक्के वयस्क नागरिकांना करोना लसीची पहिली मात्रा देण्यात आलेली आहे. १५ वर्षांपुढील सुमारे ८५ टक्के नागरिकांना दुसरी मात्राही दिली गेली आहे. करोनापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर लसीकरण हेच सर्वाधिक प्रभावी कवच आहे, असे मत मोदींनी व्यक्त केले.

सार्वजनिक ठिकाणी निर्बंध पाळावे

सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इन्फ्लुएन्झाचा संसर्ग झालेल्या व श्वसनाच्या आजाराने गंभीर असलेल्या सर्वच्या सर्व रुग्णांची आरटी-पीसीआर नमुना चाचणी झाली पाहिजे. त्यातील करोना बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेिन्सगसाठी पाठवावेत. त्यातून उत्परिवर्तित विषाणूची वेळेवर माहिती मिळू शकेल आणि करोनाची संभाव्य लाट टाळता येईल. सार्वजनिक ठिकाणी निर्बंध पाळावे लागतील पण, लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल, असे मोदी म्हणाले.

‘आरोग्यविषयक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष नको’

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही मोदींनी दिला. दोन वर्षांमध्ये प्राणवायूंच्या पुरवठय़ापर्यंत करोनाशी संबंधित अनेक पायाभूत सुविधा पुरवण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला. खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रे, पीएसए प्राणवायू प्रकल्प वगैरे आरोग्यविषयक सुविधांचे वेगाने आधुनिकीकरण झाले पाहिजे. या सर्व आरोग्य यंत्रणा कार्यान्वित राहतील याची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारांनी जबाबदाऱ्यांचे वाटप केले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय येथील पायाभूत सुविधा तसेच, मनुष्यबळही अधिक विकसीत केले पाहिजे. आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट केले पाहिजे, अशा सूचनाही मोदींनी केल्या.