PM Modi Donald Trump G7 Meeting updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १६ महिन्यांनी समोरासमोर आल्याची घटना फ्रान्स येथे घडली आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी७ शिखर परिषदेसाठी उभय नेते उपस्थित आहेत. यावेळी शिखर परिषदेच्या कामकाजापूर्वी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी स्मितहास्य करत एकमेकांना अभिवादन केले. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले, तसेच त्यांच्या हातावर थाप मारत संवाद साधत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
जी-७ शिखर परिषद १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे होत आहे. फेब्रुवारी २०२५ मधील वॉशिंग्टन भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची ही पहिलीच भेट आहे. गेल्या काही दिवसांत भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये काही अंशी तणाव निर्माण झाल्यामुळे या भेटीकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेसाठी जागतिक नेते एकत्र आले असताना ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काही वेळ संवाद झाला. एएनआयने या संवादाचा एक व्हिडीओ समोर आणला आहे. ज्यात बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी २०२५ त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अमेरिका आणि भारतात व्यापार करार आणि रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरून खडाजंगी झाली. ट्रम्प प्रशासनाने भारताच्या आयातीवर ५० टक्के आयातशुल्क लादले होते. यातील २५ टक्के शुल्क हे भारताने रशियाकडून कच्चा तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून लावण्यात आले होते.
तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूबद्दल चर्चा?
अमेरिका-इराण-इस्रायल युद्धादरम्यान गेल्या आठवड्यात ओमानच्या समुद्रात अमेरिकन नौदलाने तीन वेळा भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना लक्ष्य केले. या कारवाईत ‘एमटी सेटबेलो’ या जहाजावर हल्ला करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत तीन भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय ‘एमटी मारिव्हिक्स’ आणि ‘एमटी जलवीर’ या अन्य दोन जहाजांवरही अमेरिकन नौदलाकडून हल्ले झाले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi and other G7 world leaders stand together for a group photo at the G7 Summit, in Evian, France.
— ANI (@ANI) June 16, 2026
(Video: DD News) pic.twitter.com/MI5YiAys44
भारताने या हल्ल्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना दोनदा समन्स बजावून या हल्ल्यांबाबत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला होता.
जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी अनेक उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करणे आणि महत्त्वाच्या प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यावर भर दिला जाईल.
यावर्षी शिखर परिषदेच्या अजेंड्यावर जागतिक आर्थिक स्थिरता, ऊर्जा सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्ष आणि इतर भू-राजकीय घडामोडी यावर लक्ष दिले जाईल, अशी माहिती मिळते.
भारत जी-७ गटाचा सदस्य नसला तरी तो जी-७ परिषदांना नियमितपणे सहभागी होत आला आहे. भारताने या मंचावरून ‘ग्लोबल साऊथ’ अर्थात विकसनशील देशांचा आवाज उचलून धरलेला आहे.
