पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची शुक्रवारी व्हाईट हाऊस इथं भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली. या दरम्यान बायडेन यांनी आठवण करुन दिली की, २००६ मध्ये त्यांनी सांगितलं होतं की २०२० पर्यंत भारत आणि अमेरिका हे जगातल्या निकटवर्तीय देशांमधले एक असतील. या दोघांच्या भेटीमुळे ही शक्यता खरी ठरताना दिसत आहे.

ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध या भेटीतून दिसून आले आहेत. ज्यो बायडेन हे पंतप्रधान मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना खुर्चीपर्यंत घेऊन गेले. त्यानंतर खुर्चीवर बसण्याचं आवाहन करत हसतहसत ते म्हणाले. मी जेव्हा उपराष्ट्राध्यक्ष होतो, तेव्हा मी याच खुर्चीवर बसायचो. पण आता इथे तुम्ही बसा, कारण मी आता राष्ट्राध्यक्ष झालो आहे. तर मोदी यांनी या सन्मानाबद्दल बायडेन यांचे आभार मानले. या संदर्भातलं सविस्तर वृत्त आजतकने दिलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. बायडेन यांनी भारत सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असल्याचं मत व्यक्त केलंय. विशेषतः अफगाणिस्तान मुद्द्यावरुन बायडेन यांनी भारताने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं.