AIMIM chief Asaduddin Owaisi Targets PM Narendra Modi: AIMIM अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकताच उझबेकिस्तान देशाच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मुद्द्यावरून ओवैसी यांनी पंतप्रधानांसह भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. तसेच, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या सगळ्या घडामोडींवर व बाबरबाबतच्या त्यांच्या भूमिकेबाबत विचार करावा लागेल, असंदेखील ओवैसी एएनआय वृत्तवाहिनीला म्हणाले. असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियुयेव यांच्याहस्ते मोदींना त्या देशाचा सर्वोच्च मानला जाणारा ‘ओली दाराजली दस्तलिक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत असदुद्दीन ओवैसी यांना विचारणा केली असता त्यांनी थेट मुघल सम्राट बाबरचा उल्लेख करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

ओवैसींनी भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना खोचक शब्दांचा वापर केला. “मी भाजपवाल्यांचं अभिनंदन करतो. त्या देशानंही पंतप्रधानांना पुरस्कार दिला, जिथून बाबर भारतात आला होता. फरगाना खोरं उझबेकिस्तानमध्येच आहे. हल्ली ते जिथे जातात, तिथून पुरस्कार घेऊन येतात. तुम्ही बाबरच्या नावावर इतके शिव्याशाप देत होते, त्याच्या देशाकडून तुम्हाला पुरस्कार दिला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर विचार करावा लागेल”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

“आम्हाला तर ते शिव्या देत होते बाबरचे अमुक-तमुक.. आता जिथून बाबर आला, त्याच देशातला नागरी पुरस्कार तुम्हाला देण्यात आला आहे. आता मला आशा आहे की संघ परिवारचे लोक, आरएसएसचे पाठिराखे बाबरचं चुकीच्या पद्धतीने नाव घेणार नाहीत. कारण फरगाना खोरं उझबेकिस्तानमध्येच आहे”, असं म्हणत ओवैसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलं आहे.

उझबेकिस्तान आणि बाबर

असदुद्दीन ओवैसींनी यावेळी बाबरच्या जन्मस्थानाचा इतिहास आणि त्यानं भारतात स्थापन केलेल्या मुघल साम्राज्याचा संदर्भ दिला. काही ऐतिहासिक दाखल्यांनुसार बाबरचा जन्म फरगाना खोऱ्यात झाला. हे खोरं सध्याच्या उझबेकिस्तानमध्येच आहे. तिथून येऊन बाबरनं भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केल्याचे इतिहासकालीन दाखले दिले जातात. हाच धागा पकडून ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींनी मानले शौकत मिर्झियुयेव यांचे आभार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुरस्कारासाठी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियुयेव यांचे आभार मानले आहेत. “माझे मित्र, उझबेकिस्तानमधील आर्थिक उत्क्रांतीचे जनक, जे या भागातील आर्थिक विकासासाठीचे रोल मॉडेल ठरले आहेत”, अशा शब्दांत मोदींनी शौकत मिर्झियुयेव यांचा उल्लेख केला. “माझा हा दोन दिवसांचा दौरा माझ्या कायम स्मरणात राहील”, असंदेखील मोदींनी नमूद केलं.