पीटीआय, नवी दिल्ली
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी ध्येयपूर्तीच्या मार्गात देशातील निवडणुकीदरम्यान होणारी जातीय विभागणी हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. विकसित देश होण्याच्या दृष्टीने ‘हम करके रहेंगे’ अशी नवी घोषणा पंतप्रधानांनी बुधवारी दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असे सरकारचे प्रमुख या नात्याने मोदींच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रांत सरकारने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी एकेकाळी कल्पनाही करता येणार नाही, अशा गोष्टी सरकारने शक्य करून दाखवल्याचे नमूद केले.

आज आपण जे विकसित भारताचे स्वप्न पाहात आहोत, ते नक्कीच सत्यात उतरेल. देशाच्या आड येईल, असे कोणतेही कारण आता राहिलेले नाही. शंभर वर्षांपूर्वी ४० कोटी लोकसंख्या होती आता ती १४० कोटींहून अधिक झाली आहे. हेच लोक एकत्र येऊन २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

राजकीय पक्षांची मतपेढीच्या दृष्टीने चालणारी सामाजिक जुळवाजुळव ही विकसित भारताच्या ध्येयपूर्तीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असे त्यांनी नमूद केले. जेव्हा शेतकर्‍यांच्या पिकाला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, तेव्हा ती समस्या एका समाजापुरती मर्यादित राहते का? जेव्हा वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा केवळ विशिष्ट समाजाच्या घरांतीलच वीज जाते का? या प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. जर एखादी समस्या प्रत्येक नागरिकाला भेडसावते, तर त्यावरील उपायही सर्वांसाठी असतो. एका दशकात दारिद्र्यरेषेखालील २५ कोटी भारतीयांची गरिबी दूर होईल, असे कोणाला वाटलेही नव्हते. पण ते करून दाखवले. ही १४० कोटी लोकांची एकत्रित ताकद आणि क्षमता आहे. देशासमोर अनेक आव्हाने असतील, पण त्यावर आपल्याकडे १४० कोटी उपायही आहेत. हा माझा विश्वास आहे. मागील २५ वर्षांतील भारताचे हेच स्थित्यंतर आपल्या डोळ्यांसमोर आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नवीन घोषवाक्य

२०४७ पर्यंत विकसित भारत आम्ही करणारच, अव्वल तीन अर्थव्यवस्थेत स्थान आम्ही करणारच, आत्मनिर्भर राष्ट्र आम्ही करणारच, जागतिक उत्पादन केंद्र आम्ही करणारच, ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आम्ही करणारच, अवकाश भरारीची ध्येयपूर्ती आम्ही करणारच, असा नारा देत पंतप्रधान मोदी यांनी ‘हम करके रहेंगे’ हे देशाचे नवे घोषवाक्य यावेळी अधोरेखित केले.

माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या भारतीयांपुढे मी नतमस्तक आहे. लोक माझ्यासाठी देव आहेत आणि तळमळीने काम करणारे भाजप कार्यकर्ते माझी ताकद. २५ वर्षांचा जनतेचा विश्वास आणि या कालावधीतील माझा राजकीय अनुभव ही एक प्रचंड मोठी संपत्ती आहे. भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राचा या संपत्तीवर अधिकार आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान