पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना रोज अधिवेशनासाठी संसदेत हजेरी लावण्यास सांगितलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी खासदारांना “जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत, तर भविष्यात योग्यवेळी बदल केले जातील,” असा इशाराही दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“संसदेतील अधिवेशन आणि बैठकींना नेहमी उपस्थित राहा. मला वारंवार तुम्हाला लहान मुलांप्रमाणे हे सांगावं लागणं चांगली गोष्ट नाही. जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत, तर भविष्यात बदल केले जातील,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये सहा खाण कामगारांसह १४ नागरिकांचा मृत्यू झाला व ११ जण जबर जखमी झाले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी निवेदनाद्वारे दिली आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाला सुरुवात होताच १२ खासदारांचं गेल्या अधिवेशनात घातलेल्या गदारोळामुळे निलंबन करण्यात आलं आहे.

याशिवाय भाजपा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही तयारी करत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबसारख्या राज्यांचा समावेश असल्याने भाजपाने आत्तापासूनच कंबर कसली आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी बैठकत संसद खेळ स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्याचं आवाहन केलं. यासोबत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम करण्याचं आवाहनही केलं असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

यावेळी त्यांनी खासदारांच्या निलंबनावर बोलताना आम्ही यामागील कारण स्पष्ट सांगितलं आहे. देशानेही जे काही झालं ते सर्व पाहिलं आहे. जर त्यांनी आजही माफी मागितली तरी निलंबन मागे घेण्यास तयार आहोत असं सांगितलं.