PM Modi and Emmanuel Macron Discussing West Asia Crisis: इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेले युद्ध आता आणखी गंभीर वळणावर पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या साउथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात इराणने कतारच्या रास लफानवर येथील वायू प्रकल्पाला लक्ष्य केले. यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर बनली आहे. यानंतर आता भारत आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी पश्चिम आशियातील परिस्थितीचा एकमेकांशी संवाद साधत आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पश्चिम आशियातील संघर्ष निवळण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीची तातडीने गरज दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या संवादाची माहिती दिली आहे. “पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स जवळून काम करत राहतील आणि समन्वय साधतील”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

pm modi talk with Macron france
पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोललो. पश्चिम आशियात आकार घेत असलेल्या परिस्थितीबद्दल आमच्या सामायिक चिंतांवर तसेच संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येण्याच्या गरजेबद्दल आम्ही चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही जवळून काम करत राहू आणि समन्वय साधत राहू.”

मॅक्रॉन यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशीही संवाद साधला. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भातील प्रश्नांची चर्चा यावेळी करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ओमानच्या जनतेला ईदच्या आगाऊ शुभेच्छा. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी आणि त्यानंतर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याच्या गरजेवर आम्ही सहमती दर्शवली. भारतीय नागरिकांसह हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ओमानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि ओमान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि मुक्त जलवाहतुकीच्या बाजूने आहेत.